करणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २०१५
करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha
करणी, चित्र: हर्षद खंदारे

रामराव पाटलांसारख्या देव माणसाच्या मुलावर केलेल्या करणीमुळे त्याची झालेली भयानक अवस्था आणि मृत्युच्या दाढेतुन रामरावांनी त्याची केलेली सुटका याची रोमांचक कहाणी म्हणजेच करणी...

सुष्टा बरोबर दुष्ट या चालीवर त्या देवमाणसावर जळणारे, त्यांना सतत पाण्यात पाहाणारे आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या विरोधात कट कारस्थाने रचणारे हंबीरराव पाटील, हे आबा पाटलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. वरकरणी ते आबांचे हितचिंतक असल्याचे दाखवत पण मनातून केवळ त्यांचे अहित चिंतत.

रामराव आणि सुशीलाबाई हे गावातील आदर्श जोडपे. रामराव साठीला पोहोचून देखील कमावलेल्या पैलवानी शरीरामुळे पन्नाशीचे वाटत. त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर एक यशस्वी शेतकरी तसेच एक यशस्वी उद्योजक म्हणून पुऱ्या पंचक्रोशीत नावलौकिक मिळवला होता. पण त्यांची खरी कमाई होती ती म्हणजे जनसामान्यात त्यांनी कमावलेली इज्जत. ते एक सहृदयी, पापभिरु आणि मनात सर्वांबद्दल अपार करुणा असलेले व्यक्ति होते. गावात कोणावरही कसलीही आपत्ती आली तरी ते वेळेला धाऊन जात. रात्री अपरात्री देखील लोकांसाठी त्यांच्या वाडयाचे दरवाजे नेहमी खुले असत. त्यांनी राजकारणात यावे व त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करुन घेता यावा म्हणुन अनेक पक्षांनी त्यांना वेळोवेळी नाना प्रलोभने दाखवली पण रामरावांनी प्रयत्नपूर्वक स्वत:ला या सर्वांपासून दूर ठेवले होते. रामरावांच्या शब्दाला गावात चांगलेच वजन होते. सरकारी दरबारात देखील त्यांना खुप मान होता. केवळ त्यांच्या शब्दावर लोकांची वर्षानुवर्षे रखडलेली कामे काही तासातच होऊन जायची. लोक त्यांना मनापासून आशीर्वाद द्यायचे. त्यांचे साधे राहणीमान, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि मधाळ वाणी क्षणात समोरच्याला आपलेसे करून घ्यायचे. त्यांच्या पत्नी सुशीलाबाई एक धार्मिक, श्रद्धाळु व कुटुंबवत्सल स्त्री होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर ममत्व झळकायचे. आपल्या पतीप्रमाणे त्या देखील सर्वांच्या मदतीला नेहेमी तत्पर असायच्या. आपल्या गावाचे जणु त्या दोघांनी पालकत्वच घेतले होते. सर्व गाव त्यांना आबा आणि माई म्हणायचा. त्या दोघांची मुळ नावे जणू सर्वजण विसरूनच गेले होते. तीच गत शंकरच्या बाबतीत होती त्याला सर्व गाव धाकले पाटील म्हणूनच हाक मारायचे.

शंकर, लग्नानंतर खुप वर्षानी मोठ्या उपास-तापास, व्रत वैकल्य आणि नवसानी झाला असल्याने आबा आणि माईंचा जीव की प्राण होता. आता त्यांचा लाडका शंकर २५ वर्षांचा तरणाबांड युवक झाला होता. वडीलांप्रमाणे तोही तालिमीत घाम गाळायचा. त्याचे पिळदार शरीर पाहुन रामरावाना आपले तरुणपणातील दिवस आठवायचे, जिंकलेल्या कुस्त्या आणि बक्षिसे आठवायची. आपल्याला उशीरा का होईना पण इष्टपुत्र दिल्याबद्दल ते देवाचे मनोमन आभार मानायचे. शंकर गुणांनी, स्वभावाने व कार्याने आपल्या वडीलांचीच आवृत्ति होता. म्हणतात ना ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’! आपले शिक्षण पूर्ण करुन शंकर शेती आणि कारखाना सांभाळू लागला होता त्यामुळे ते आता निर्धास्त झाले होते. लवकरच एखादी चांगली मुलगी पाहुन शंकरचे हात पिवळे करावे असा विचार करुन त्यांनी शंकरसाठी मुली बघायला सुरवात पण केली होती.