जातबळी भाग ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जून २०१८
जातबळी भाग ६ - मराठी कथा | Jaatbali Part 6 - Marathi Katha
जातबळी भाग ६

“अरे दादा, मला टॉयलेट लागल्यामुळे जाग आली. झोपेतच मी बेडवरुन खाली उतरलो. माझा पाय तुझ्या हातावर पडला आणि मी तोल जाऊन तुझ्या अंगावर कोसळलो. पण तुझ्याकडून कसलीच रिऍक्शन नाही मिळाली. म्हणुन मी तुझ्या छातीवर हात ठेवला तर हार्टबीट जाणवेना, नाका जवळ हात नेला तर तुझा श्वासोच्छवास पण सुरु नव्हता. मग मी घाबरलो आणि आई बाबांना जाऊन उठवले.” आकाशचा लहान भाऊ अनुज म्हणाला.

“तरीच मी म्हणतोय माझ्या बरगडीत दुखतंय का?” आकाश आपली बरगडी चोळत म्हणाला. “आकाश खरं सांग काय चाललंय? तुझी नाडी का सुरु नव्हती? कसल्या बिनकामाच्या साधना सुरु आहेत तुझ्या?” आकाशची आई त्याला दमात घेत म्हणाली. “अगं आई खरंच काही नाही सुरु आहे. मलाच माहित नाही काय झाले होते ते!” आकाश तिची नजर चुकवत म्हणाला. “आता तू सांगतोस, की मी जोशी काकांना फोन लावू? तो ही या वेळी!” आईने पुन्हा आपले ठेवणीतले अस्त्र बाहेर काढले.

मग आकाशला नाईलाजाने जोशी काकांकडून शिकलेल्या विद्येबद्दल सर्व काही सांगावेच लागले. ते ऐकताच तिने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. “नालायका तू सूक्ष्म रूपात गावभर उंडगत होतास आणि आमच्या जीवाला फुकटचा घोर लावलास. खरं सांग त्या नभाला भेटायला गेला होतास ना?” आईने हा प्रश्न घरातील सर्व सदस्यांसमोर, खास करून बाबांसमोर विचारल्यामुळे आकाश पुरता क्लीन बोल्ड झाला. “आई पण ना! हिला न सांगता सगळे कसे काय कळते देव जाणे! पण बाबांसमोर हे विचारायची काय गरज होती?”