जातबळी भाग ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जून २०१८
जातबळी भाग ६ - मराठी कथा | Jaatbali Part 6 - Marathi Katha
जातबळी भाग ६

पण गडबडीत त्याच्या शर्टची कॉलर खिडकीच्या झडपेत अडकली आणि खिडकी उघडली गेली. त्यामुळे हलका पण स्पष्ट आवाज झाला. तो आवाज नभा आणि आकाश दोघांच्या कानांनी टिपला. त्याच क्षणी ते एकमेकांच्या मिठीतुन दूर झाले. खिडकी उघडली गेल्यामुळे चंद्राचा प्रकाश खोलीत पसरला “नक्कीच खिडकी जवळ कोणीतरी आहे, आकाश प्लिज तू आता जा आपण उद्या भेटू” घाबरलेली नभा म्हणाली. तिचे पटकन एक चुंबन घेत आकाशचा आत्मा तिथून नाहीसा झाला.

तो प्रकार पाहून चारही मामा चाट पडले. “म्हणजे ती पोरगी सांगत होती ते खरे होते तर!” रवी पुटपुटला. ते चौघेही तिथून अंधारात गायब झाले आणि तिथून जवळच असलेल्या एका लॉजमधील दुपारीच बुक केलेल्या आपल्या रूममध्ये आले. नभा आणि आकाशचा प्रणय प्रसंग आणि त्याहीपेक्षा आकाशचे हवेतल्या हवेत गायब होणे आठवून त्या चौघांची मतीच गुंग झाली होती. रवीला काय बोलावे तेच समजत नव्हते सुभाष प्रचंड भडकला होता.

आपल्या मुठी आवळत तो म्हणाला “आत्ता जाऊ आणि त्या भाडxxचे सगळे खानदान कापून काढू.” “नाही! आत्ता नाही. अशी काही तरी आयडिया केली पाहिजे की साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. आपल्या नभाला बहकवणाऱ्या त्या हरामखोराला तडफडवून मारायचं पण तिच्या नकळत. नाहीतर ती स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी त्या राकेश आणि पूजाला बोलवून घ्या. त्यांच्याशी बोलून मग ठरवू काय करायचे ते” रवी सुभाषला अडवत म्हणाला.