जातबळी भाग ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जून २०१८
जातबळी भाग ६ - मराठी कथा | Jaatbali Part 6 - Marathi Katha
जातबळी भाग ६

बराच वेळ काहीच हालचाल जाणवली नाही तसे ते वैतागु लागले होते. साधारण १२ वाजता आकाशचा आत्मा नभाच्या खोलीत आला. नभा त्यावेळी झोपेच्या अंमला खाली होती. बराच वेळ तो तिला एकटक पाहत राहिला. तिची झोप डिस्टर्ब् करायचे त्याच्या जीवावर आले होते. एवढ्यात नभाला कसलीशी चाहुल लागली आणि तिने डोळे उघडले. आकाशला एकदम समोर पाहून ती दचकली आणि किंचाळणार एवढ्यात आकाशने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. "ओरडू नकोस, मी आहे. तुच रात्री ये म्हणाली होतीस ना? केवढी घाबरतेस? आता किंचाळली असतीस तर केवढा गोंधळ झाला असता? बिनडोक कुठली!" तो दबक्या आवाजात म्हणाला.

“मी झोपेत होते, तुला एकदम समोर पाहिल्यामुळे मी घाबरून गेले. सॉरी ना! किती चिडतोस माझ्यावर?” असे म्हणत नभाने हाताची घडी घालत आपले तोंड फिरवले. आपली चुक लक्षात येताच आकाशने आपले कान पकडले, “बरं वेडाबाई! हे बघ मी कान पकडले, आता नाराज नको ना होऊस, प्लिऽऽऽज!” त्याने ‘प्लिज’ एवढे एवढ्या विनोदी पद्धतीने म्हटले की नभाला खुद्कन हसू आले. तिचा राग कुठल्या कुठे पळाला. त्याच्या गळ्यात हात घालून तिने त्याला आपल्या जवळ खेचले.

दोघे एकमेकांच्या बाहुपाशात गुंतले. आकाशचे ओठ नभाच्या ओठांना भेटण्यासाठी अलगद खाली झुकले, पापण्यांच्या आडून पाहताना तिचे डोळे मात्र खुद्कन हसले. दोघे एकमेकांत हरवले असताना खिडकीच्या फटीतून त्यांचा प्रणय प्रसंग पाहणारे डोळे मात्र आग ओकत होते. आपली भाची एका पर जातीतील मुलासोबत रंग उधळत असल्याचे पाहून रवीला राग अनावर झाला. ते पाहाणे असह्य झाल्यामुळे तो मागे सरकला.