जातबळी भाग ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जून २०१८
जातबळी भाग ६ - मराठी कथा | Jaatbali Part 6 - Marathi Katha
जातबळी भाग ६

“हा विषय इथेच थांबवूया. मी उद्या जोश्याला जाऊन भेटतो मग ठरवू काय करायचे ते. तो पर्यंत तू तुझी साधना आणि तू तुझे जप, जाप, पूजा पाठ वगैरे सुरूच ठेव.” आकाशचे वडील आकाश आणि आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले. “चला आता झोपायला जा सगळे.” असे म्हणुन ते आपल्या खोलीत निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ आईही गेली पण जाता जाता तिने आकाशकडे पहिले आणि म्हणाली, “मरणावर मस्त स्पिच दिलेस पण माझ्या मनाच्या यातना तुला कधीच समजू शकणार नाहीत, त्यासाठी तुला आईच्या जन्माला यावे लागेल.”

आकाशवर जीवापाड प्रेम करणारी, प्रसंगी त्याला बाबांच्या रागापासून वाचवणारी त्याची आजीही तिच्या खोलीत निघून गेली पण काहीही न बोलता, याचे आकाशला फार वाईट वाटले. अनुजला वाटले की दादा आता सगळा राग त्याच्यावर काढणार. नकळत का होईना आकाशचे सिक्रेट त्याच्याकडूनच उघड झाले होते. पण आकाश त्याला काहीच बोलला नाही आणि निमूट झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश आणि पूजाला सुभाष मामाने फोन करून लॉजवर बोलावून घेतले. पूजा मोबाईल घेऊन तयारीतच गेली. ते दोघे आल्यावर रवी म्हणाला, “त्या आकाशचा काटा काढायचा आहे, आणि या कामात आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. पण या गोष्टीची खबर नभाला बिलकुल होता नये.” रवीच्या या वाक्यावर राकेशने पूजाकडे सूचक अर्थाने पाहिले, जणू त्याला तिला म्हणायचे होते, बघ मी सांगितले नव्हते तुला, की यांना आपली गरज लागणार म्हणुन?