जातबळी भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जून २०१८
जातबळी भाग ५ - मराठी कथा | Jaatbali Part 5 - Marathi Katha
जातबळी भाग ५

राकेशची तब्येत एव्हाना सुधारली होती आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज पण मिळाला होता. त्याला त्याच्या मित्रांकडून आकाशचे नभा नावाच्या मुलीशी प्रेम जुळल्याचे कळले होते. आकाशला कसे गोत्यात आणायचे याचाच तो दिवसरात्र विचार करत असे. एकदा समुद्रावर तो मित्रांसोबत बसलेला असताना त्याला त्याची मैत्रीण पूजा दिसली आणि त्याच्या कुटील डोक्यात एक डाव शिजला. त्याने तिला हाक मारली तशी ती मैत्रिणींना पुढे जायला सांगून त्याच्याकडे गेली. तोही त्याच्या मित्रांपासून थोडा दूर जाऊन तिच्याशी बोलू लागला.

“कशी आहेस? आणि आहेस कुठे सध्या? परीक्षा झाल्यापासून गायबच आहेस.” “अरे सुट्टी होती ना, म्हणुन आजी आजोबांकडे गावी गेले होते. रिझल्ट लागला तसे आले परत. तू सांग तुला किती पर्सेंट मिळाले?” पूजाच्या या प्रश्नावर राकेशचा चेहरा पडला. “कसले पर्सेंट? नापास झालोय परत! तो आकाश मात्र पास झाला.” तो उदास स्वरात म्हणाला. स्वतःच्या नापास होण्यापेक्षा आकाशच्या पास होण्याचे त्याला जास्त दुःख झाले होते. “अरे हा! आकाश वरून आठवले, रश्मी कशी आहे?”

“काय सॉलिड ठासली होती ना आपण त्या आकाशची!” असे म्हणुन पूजा हसू लागली पण राकेशचे तोंड पडलेले पाहून तिने आपले हसू आवरते घेतले. “काय रे काय झाले? सगळे ठीक तर आहे ना? रश्मीशी भांडलास की काय?” तिने काळजीने विचारले. त्यावर राकेश उसळून म्हणाला, “नांव काढू नकोस तिचे. त्या आकाश पासून तिला दूर केले पण शेवटी त्याच्याचकडे गेली ती! मला डिच केले तिने.” “काय सांगतोस काय? हे सगळे मला नवीन आहे. तू काही सांगितलेस का नाही?” पूजाला धक्काच बसला होता.