जातबळी भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जून २०१८
जातबळी भाग ५ - मराठी कथा | Jaatbali Part 5 - Marathi Katha
जातबळी भाग ५

दररोज संध्याकाळी न चुकता तो आपली साधना करत असे आणि जोशी काकांकडे जाऊन आपल्या ज्ञानात भर पाडत असे. आकाशने नोकरी सोडल्याचे कळताच नभाच्या आईला खुप आनंद झाला आता तो नभाला रोज भेटणार नाही असे तिला वाटले. पण आकाश जेव्हा काम करून थकल्यावर आपल्या शेतघरामध्ये आराम करत असे, त्याचा आत्मा क्षणात नभाच्या जवळ जात असे. तो नभाच्या गालाचे अलगद चुंबन घेऊन आपल्या आगमनाची तिला जाणीव करून देत असे.

मग ती काही बहाण्याने वॉशरूममध्ये किंवा बुक स्टोअररूम मध्ये जाऊन आकाशच्या आत्म्याशी हळू आवाजात बोलत असे. एरव्ही पाचच मिनिटात वॉशरूम मधून परतणारी नभा आता अर्धा अर्धा तास घेऊ लागल्याचे रसिकाच्या लक्षात आले. तिने तिला काळजीने विचारलेही की काही प्रॉब्लेम आहे का म्हणुन पण नभाने काही नाही म्हणुन वेळ मारून नेली. स्टोर रूम मधेही नभा कोणाशी तरी बोलत असल्यासारखे रसिकाला अनेकदा जाणवले तिने आत डोकावले असता कोणीही दिसले नाही. तिने नभाकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण नभाने ताकास तूर लागू दिला नाही.

हळू हळू आकाशची साधना वरच्या स्तराला पोहोचली व आता त्याचा आत्मा दृश्य स्वरूपात नभासमोर येऊ शकत होता. नभाला याचा खुप आनंद झाला कारण ती तिच्या प्राणाहून प्रिय असलेल्या आकाशला आता केवळ ऐकूच नव्हे तर पाहू पण शकत होती. जगापासून दूर ते दोघे आपल्याच विश्वात तासंतास हरवलेले असायचे. रात्री एकमेकांशी बोलत बसायचे. आपल्या भावी आयुष्याचे सुंदर स्वप्न रंगवायचे. त्यांना कल्पनाही नव्हती की नियती त्यांच्यासाठी काहीतरी वेगेळेच प्लॅन करत होती. आत्तापर्यंत आलेल्या अडचणी या तर फक्त ट्रेलर होत्या, खरा सिनेमा तर आता सुरु होणार होता.