जातबळी भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जून २०१८
जातबळी भाग ५ - मराठी कथा | Jaatbali Part 5 - Marathi Katha
जातबळी भाग ५

तिच्या मनाने पुन्हा उभारी घेतली. तिने त्याला वचन दिले आणि तो नेहेमी प्रमाणे तिच्या गालाचे चुंबन घेऊन तिथून निघून गेला. नभाला आपल्या गालावर गुदगुदल्या झाल्यासारखे वाटले. तिने आपले डोळे पुसले आणि लाजत तिच्या खोलीतून बाहेर पडली. समोरच आईला पाहून मात्र तिच्या काळजात धस्स झाले. आईची नजर चुकवून तिने बाथरूममध्ये जाऊन कडी लावली. गरम पाण्याच्या धारांनी तिचे रोम रोम पुलकित झाले. बराच वेळ ती आपल्या शरीरावर गरम पाण्याचा शॉवर घेत होती. आंघोळ केल्यावर तिला खुप फ्रेश वाटू लागले.

तिच्या शरीराचा थकवा आणि मनाची मरगळ क्षणात दूर पळाली. तिच्या मनात आकाशचा विचार आल्यावर ती स्वतःशीच गोड लाजली. ती स्वतःचे रूप आरशात पाहण्यात गुंग असतानाच दरवाजाची कडी वाजली आणि ती भानावर आली. “आले !” म्हणत तिने पटकन आपले कपडे बदलले आणि बाहेर आली. समोर आईला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पुन्हा तिची नजर चोरत ती आपल्या रूमकडे जाऊ लागली तसे तिच्या आईने तिला अडवले.

“काय गं मगाशी रसिका आली तेव्हा तर तुझ्या अंगात उठायचे पण त्राण नव्हते आणि आता अचानक असे काय झाले की तू एकदम ठणठणीत बरी झाल्यासारखी दिसतेस? एरव्ही तर तुला अंघोळीला पाच मिनिटे पण पुष्कळ होतात आणि आज चक्क अर्धा तास लागला ते ही मध्यरात्री. काय करत काय होतीस इतका वेळ? आणि मला एक सांग, तुझ्या खोलीत कोणी आलं होत का? तू कोणाशी तरी बोलत असल्यासारखे मला वाटले.” आईच्या या प्रश्नाने नभा एकदम गडबडली पण स्वतःला सावरत म्हणाली, “काहीतरीच काय तुझे?”