जातबळी भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जून २०१८
जातबळी भाग ५ - मराठी कथा | Jaatbali Part 5 - Marathi Katha
जातबळी भाग ५

“अगं तुझ्या आईने आपली ताटातूट केल्यावर माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी जोशी काकांच्या मागे लागून आत्मा शरीराबाहेर कसा काढायचा आणि इच्छित स्थळी कसे जायचे ते शिकून घेतले आहे आणि तुला भेटण्यासाठी आलोय. माझे शरीर माझ्या घरी आहे, केवळ माझा आत्मा सूक्ष्म रूपाने इथे आलाय. दृश्य रूपात कसे यायचे ते मला अजून माहित नाही पण मी ते लवकरच माहिती करून घेईन आणि मग तू मला पाहू सुद्धा शकशील. अशा प्रकारे तू कुठेही असलीस तरीही आपण भेटू शकू. काय माहित पुढे मागे तू मला स्पर्श पण करू शकशील. पण आत्ता तरी तुला केवळ माझ्या आवाजावर समाधान मानावे लागेल.” आकाशचा आत्मा म्हणाला.

ते ऐकून नभाचा विश्वासच बसेना. कोणी आपल्या शरीरापासून आत्मा कसा वेगळा करू शकतो? आत्मा शरीराबाहेर पडला की मृत्यू, एवढे सोपे गणित तिला ठाऊक होते. तिचे डोकेच काम करेनासे झाले. स्वतःला सावरल्यावर तिने पुन्हा आकाशला आवाज दिला. “आकाश, तू अजूनही आहेस का इथे?” “हो गं राणी! मी इथेच आहे. अगदी तुझ्या जवळ!” आकाशचा आत्मा उत्तरला. त्याच्या उत्तराने नभाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आकाशने केवळ आपल्यासाठी निसर्गाच्या विपरीत अशी अशक्य गोष्ट साध्य केली याचे तिला प्रचंड कौतुक वाटले.

तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आकाशचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला. “मला आत्ता जायला हवे. लवकरच माझ्या साधनेने मी माझ्या शरीराबाहेर जास्त काळ राहण्याचे कसब आत्मसात करून घेईन. पण तू मला वचन दे की तू आता लवकर बरी होशील. स्वतःचे हाल करून घेणार नाहीस. आता आपल्याला भेटण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आता सगळी काळजी बाजूला ठेव आणि आनंदात राहा. बघ तुझा वेडोबा तुझ्यासाठी काय काय करतो ते! चल मी निघू आता?” तो जाणार म्हणुन ती हिरमुसली पण आता तिला १० हत्तीचे बळ आले होते.