जातबळी भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जून २०१८
जातबळी भाग ५ - मराठी कथा | Jaatbali Part 5 - Marathi Katha
जातबळी भाग ५

“माझे काम झाले की तू लगेच जॉब सोडलास तरी चालेल. करशील एवढे माझ्यासाठी?” राकेशने पूजाच्या डोळ्यात रोखून बघत विचारले. “मला जॉब वगैरे करायची इच्छा नाही पण थोड्याच दिवसांचा प्रश्न असेल तर मी करेन. पण त्यांच्याकडे ओपनिंग आहे का? पूजाने तोंड वाकडे करत विचारले. "ती माहिती मी काढली आहे. त्यांना आता एका रिसेप्शनिस्टची गरज आहे तू उद्याच तिथे जा आणि कामाला लाग.” राकेश उत्साहाने म्हणाला. “ठीक आहे तुझ्यासाठी म्हणुन करते पण मी जास्त दिवस तिथे नाही थांबणार आधीच सांगते.” पूजा तोऱ्यात म्हणाली.

दुसऱ्या दिवशी पूजा त्या ऑफिसमध्ये गेली. नभा आणि सरांनी तिचा इंटरव्ह्यु घेतला. नभाने ओके म्हटल्यावर सरांनी पूजाला रिसेप्शनिस्टच्या पोस्टवर अपॉईंट केले. नभा पूजाला ओळखत नसल्याने तिच्यावर तिला काहीच संशय आला नाही. तिने पूजाला तिचे काम समजावून सांगितले. इन्क्वायरी आल्यावर काय आणि कसे बोलायचे ते शिकवले. तिच्याकडून दोन तीन दिवस प्रॅक्टिस करून घेतली. ती व्यवस्थित काम करू शकते याचा विश्वास वाटल्यावर नभाने ते काम तिच्यावर सोपवून आपल्या कामात लक्ष घालायला सुरवात केली.

नवीन असल्यामुळे नभा पूजाला सर्व प्रकारे सहकार्य करू लागली. जेवायला पण दोघी एकत्रच बसू लागल्या. पूजाने बोलण्या बोलण्यातून नभाकडून काही माहिती मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण नभाने तिला ऑफिस मधील कामाव्यतिरिक्त वैयक्तिक अशी कोणतीही माहिती पुरवली नाही. नभाला आपल्या जाळ्यात अडकवणे तेवढे सोपे नाही हे पूजा समजून चुकली होती पण तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले.