जातबळी भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१८
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
जातबळी भाग ४

“नाही मला नाही माहीत, ताई काही बोलली नाही कधी.” पूनम चाचरत बोलली. त्याबरोबर तिच्या आईच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. “अगं नाही कसं? तो तिच्यासाठी किती करतो! आपल्या पण अडी नडीला धावून येतो. ते काय उगाच? त्यांच्या नजरेत एकमेकांसाठी प्रेम दिसते की! मला पण त्याचा स्वभाव खुप आवडतो. आपल्या नभाला तो आवडत असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी आनंदाने त्यांचे लग्न लावून देईन. शेवटी जातीपेक्षा आपल्या नभाचे सुख जास्त महत्वाचे. ती खुश तर आपण खुश.”

आईचे हे बोलणे ऐकून पूनम आवाक झाली. “अगं पण मामांना कोण समजावणार?” पूनमच्या भाबडा प्रश्न. “तू मामांची काळजी करू नकोस ते पण आता मॉडर्न झाले आहेत. तसेही आजकाल कोणी एवढी जातपात मानत नाहीत. किती तरी इंटरकास्ट लग्न होतात. तू फक्त मला सांग त्यांच्यात काही आहे का? नाही म्हणजे, काही असेल तर बोलण्यात अर्थ आहे. नाही तर विषय काढून मीच तोंडावर पडायचे.” पूनम आईच्या जाळ्यात पूर्ती फसली आणि तिने आईला सर्व काही सांगितले.

नभाच्या आईला जे हवे होते ते तिने पूनमकडून हळूच काढून घेतले. त्या रात्रीच तिने एस.टी.डी बूथ वरून आपल्या मोठ्या भावाला रवीला फोन लावला. त्याच्या कानावर नभा आणि आकाश मध्ये फुलत असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले. आधी रवी चिडला पण सर्व भाचे कंपनीत त्याचे नभावर सर्वात जास्त प्रेम होते, त्यामुळे त्याने थोडे सबुरीने वागण्याचा सल्ला आपल्या बहिणीला दिला. आधी नभा आकाशमध्ये कितपत गुंतली आहे याचा अंदाज घेऊन मग तुकडा पाडण्यास त्यांने सांगितले.