जातबळी भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१८
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
जातबळी भाग ४

इकडे नभाच्या आईचे मन तिला सांगू लागले की आपल्या मुलीचे लक्षण काही ठीक दिसत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच काही तरी उपाय करावा लागेल हे तिने जाणले. पण त्या आधी आपला संशय खरा आहे का? याची खातरजमा करण्यासाठी तिने एक चाल खेळली. तिने नभा आणि पूनमसोबतचे आपले वागणे एकदम बदलले. ती त्या दोघींशी खुप प्रेमाने वागू लागली. बोलण्यात ती आकाशचा उल्लेख वारंवार करू लागली. एरव्ही आकाशबद्दल सतत उणे दुणे काढणारी ती, आता त्याचे गोडवे गाताना थकत नसे.

आकाशबद्दल बोलताना ती त्या दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असे. आकाश घरी आल्यावर तो आणि नभा एकमेकांशी खाणा खुणा करतात का? त्यांची सतत नजरा नजर होते का? ते प्रेमात असल्याचा कोणताही पुरावा नकळत देत तर नाहीत याकडे ती बारीक लक्ष ठेवत असे. नभाच्या लक्षात तिचा डाव आला होता त्यामुळे ती काही रिऍक्शन द्यायची नाही. तिने आकाशलाही याची कल्पना दिली होती त्यामुळे तो ही केवळ तिचा एक सहकारी असल्यासारखाच वागायचा.

एकदा पूनम आणि तिची आई दोघीच घरात असताना, तिने बोलता बोलता विषय काढला, “पूनम! आकाश कसा वाटतो तुला? म्हणजे त्याचा स्वभाव, त्याची फॅमिली वगैरे. नभा काही बोलली का तुला?” पूनमला तिचा रोख कळला नाही, ती सहज बोलावे तसे बोलून गेली, “चांगला आहे. समजुतदार आहे. नेहेमी हसतमुख असतो. त्याच्या फॅमिलीत चारच जण आहेत. तो, त्याचे आई वडील आणि भाऊ. हा, एक आजी पण आहे असे ताई सांगत होती. “तिला आवडतो का गं तो?” आईच्या या प्रश्नावर पूनम सावध झाली. कारण तिला चांगले माहीत होते की तिची आई जातीबद्दल किती आग्रही आहे ते.