जातबळी भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१८
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
जातबळी भाग ४

“मला राकेश आणि पूजाने केलेल्या कारस्थानाबद्दल सर्व काही तेव्हाच कळले होते रश्मी.” आकाश पुटपुटला. “काय? तुला सर्व माहीत होते? मग तू मला का नाही समजावून सांगितलेस? कदाचित आज परिस्थिती वेगळी असती.” रश्मी भावुक होत म्हणाली. “त्याचा काही उपयोग झाला नसता कारण तू पुर्णपणे त्या दोघांच्या कह्यात गेली होतीस. मी काही बोलायला गेलो असतो तर तू माझ्यावरच संशय घेतला असतास. त्यामुळे मी ते काळावर सोपवले. खोटं कधी ना कधी उघडं पडतंच आणि खरे समोर आल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याला काही वेळ जाणे गरजेचे असते. आज तुझे तुलाच उमगले की सत्य काय आहे.” आकाश समजावणीच्या सुरत म्हणाला.

“हो, पण कदाचित सत्य समोर येण्याआधीच जर राकेशने माझ्या आयुष्याची वाट लावली असती तर?” रश्मीने दुःखावेगाने विचारले. “नाही, माझी खात्री होती की तसे झाले नसते. कारण मी राकेशला पण चांगलाच ओळखतो आणि तुलाही. तो तसा प्रयत्न करणार यात शंकाच नव्हती पण तू तसे होऊ देणार नाहीस हा माझा विश्वास होता जो तू सार्थ ठरवलास.” आकाश तिची समजूत काढत म्हणाला. आय एम रिअली सॉरी, खूप मुर्खासारखे वागले मी! मला तुझे प्रेम समजलेच नाही. अल्लड होते रे मी. “आकाश, तू माझ्यावर अजुनही रागावला आहेस का?” रश्मीने आकाशच्या डोळ्यात खोल पाहत विचारले.

तिच्या प्रश्नाचा रोख ओळखून आकाश म्हणाला, “नाही रश्मी, मी तुझ्यावर रागावलेला वगैरे अजिबात नाही कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले होते. फक्त सुरवातीला थोडा दुखावलो गेलो होतो. वाईट ह्याचे वाटले की तू हलक्या कानांची निघालीस. कसलीच शहानिशा न करता, तू त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेऊन मी न केलेल्या गुन्ह्यासाठी मला शिक्षा दिलीस.” ते ऐकताच रश्मीची नजर शरमेने खाली झुकली. आकाश पुढे म्हणाला, “पण म्हणतात ना जे घडतं ते चांगल्या साठीच आणि पान गळतं ते पालवीसाठीच. तू माझ्याकडे पाठ फिरवलीस आणि नंतर माझ्या आयुष्यात नभा आली.”