जातबळी भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१८
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
जातबळी भाग ४

हॉस्पिटल मधुन बाहेर पडल्यावर रश्मीने आकाशसमोर राकेशच्या चुकांचा पाढा वाचण्यास सुरवात केली पण तिला तिथेच थांबवत आकाशने गाडीवर बसण्यास सांगितले. त्याला तमाशा सुरु होण्याआधीच लवकरात लवकर तिथून निघायचे होते. त्याने वेगाने गाडी हॉस्पिटलच्या कंपाउंड बाहेर काढली आणि बस स्टँडच्या दिशेने दामटली. जयस्तंभावरून लेफ्ट घेऊन तो सरळ समुद्रावर येऊन थांबला. रश्मी गाडीवरून उतरल्यावर आकाशची नजर रश्मीकडे गेली, तिच्या ओठातून रक्त आले होते.

त्याने पटकन आपल्या खिशातून रुमाल काढला. गाडीच्या डिक्कीतून पाण्याची बाटली काढून रुमाल ओला केला आणि रश्मीच्या ओठाला झालेली जखम पाण्याने साफ केली. पाणी जखमेला लागताच तिला चांगलेच चुरचुरले. नकळत तिने आपली जीभ ओठावरून फिरवली. तिचे लक्ष आकाशकडे गेले. तो तिच्याकडे एकटक पाहात होता. त्याच्या एकटक पाहण्यामुळे लाजलेली रश्मी ओढणीशी चाळा करत म्हणाली, “काय झाले आकाश? असा का बघतोयस माझ्याकडे?”

“अगं कुठून आणलेस एवढे धाडस? काय मस्त वाजवल्यास तू राकेशच्या? नाजुक, शांत आणि संय्यमी असलेली ती रश्मी आज कुठे गायब झाली होती?” आकाश आश्चर्याने म्हणाला. “मग काय? किती सहन करायचे? त्याच्या असल्या चिप वागण्यामुळेच मी त्याच्याशी बोलणे भेटणे सोडले होते. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याचे त्याच्या मित्राकडून कळले म्हणुन न राहवून मी त्याला बघायला आले तर त्याने माझ्याच कानाखाली वाजवली. मग एवढ्या दिवसाचा राग, अपमान आज बाहेर पडला, त्यात माझी काय चुक आहे?”