जातबळी भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१८
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
जातबळी भाग ४

अचानक झालेल्या या प्रकाराने बेसावध असलेली रश्मी कोलमडून खालीच पडली असती पण आकाशने वेळीच तिला सावरले. रागाने लाल बुंद झालेल्या रश्मीने एकदम रुद्रावतार धारण केला तिने राकेशचे केस पकडून त्याचे डोके लोखंडी कॉटच्या कडेवर आपटले. राकेशच्या मस्तकात जीवघेणी कळ उठली. हे कमी झाले म्हणुन की काय तिने त्याच्या मुस्काटात चांगल्या दोन ठेऊन दिल्या. ती एवढी चिडली होती की काही कळायच्या आत तिची लाथ राकेशच्या छातीत बसली आणि तो कॉटवरून पलीकडे फेकला गेला. आत्तापर्यंत राकेशने दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल तिच्या मनात साचलेल्या संतापाचा तो उद्रेक होता.

सहाजिकच वॉर्डमध्ये असलेले पेशंट, त्यांचे नातेवाईक, वॉर्ड बॉय, नर्स अश्या बघ्यांची गर्दी झाली. आकाशने रश्मीला कसे बसे थोपवून धरले होते. “रश्मी, आवर स्वतःला नाहीतर तुला सोडवायला मला पोलीस स्टेशनला यावे लागेल” असे तो रश्मीच्या कानात पुटपुटला. “नाही आकाश, या कुत्र्याची हीच लायकी आहे. खुप छळले आहे मला याने. प्रेम नुसते बोलण्यापुरते, बघावे तेव्हा याच्या नजरेत केवळ वासनाच दिसायची. मी यांच्यापासून कशी माझी अब्रू टिकवून ठेवली आहे ते माझे मला माहीत आहे. तुला नाही माहीत तुझ्या बद्दल नको नको ते सांगून ह्याने आणि त्या पूजाने माझे मन कलुषित केले होते.”

रश्मीचा आवाज खुपच चढला होता. परिस्थिती हाताबाहेर चाललेली पाहून, “मला सर्व माहीत आहे तू आधी इथून बाहेर चल” म्हणत आकाशने रश्मीला बळेबळेच वॉर्डच्या बाहेर नेले. तिथे आलेल्या सिक्युरीटी गार्ड्सनी राकेशला उचलून परत त्याच्या कॉटवर ठेवले. अपमानाने खजील झालेला राकेश आतल्या आत धुमसत होता. आकाशच्या पाठोपाठ त्याच्या बदल्याच्या लिस्टमध्ये आता रश्मी पण ऍड झाली होती. पुढे मागे संधी मिळाल्यावर आकाशसोबत रश्मीलाही जन्माची अद्दल घडवण्याची त्याने शपथ घेतली.