जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

“मी सांगतो ना तुला समजावून भाडxx” असे म्हणुन राकेश आकाशवर धावून गेला. तो पर्यंत आकाश बाईकवरून उतरला होता. राकेशने आकाशला पंच मारण्यासाठी हात उचलला पण आकाशने खाली वाकत तो वेळीच चुकवला. वर उठताना त्याने दिलेल्या जोरदार ठोशाने राकेशच्या नाकाचा आकार बदलवून टाकला. वर उसळून राकेश मागच्या मागे रस्त्यावर आदळला आणि त्याचे डोके जमिनीवर आपटले. नाकातून आणि डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्याचा पांढरा शर्ट लाल होऊन गेला. आकाशचा पंच एवढा जबरदस्त होता की राकेशच्या अंगातली सगळी मस्ती जिरली. तो पलटवार करण्याच्या परिस्थितीत उरला नव्हता.

राकेशला जमिनीवर लाळागोळा झालेले पाहून त्याच्या सोबत आलेल्या चारही पोरांची पुंगीच टाईट झाली होती. तरीही त्यातल्या एकाने डेअरिंग करून आकाशवर रामपुरीने हल्ला चढवला. पुर्णपणे सावध असलेल्या आकाशने त्याच्या हातावर एक साईड किक मारली. त्याच्या हातातील चाकू दूर जाऊन पडला. त्याचवेळी वेगाने पुढे आलेल्या आकाशचा गुडघा त्या मुलाच्या हनुवटीवर बसला आणि पुढच्याच क्षणाला तो राकेशच्या पंगतीत जाऊन पडला. दोघांची ती अवस्था पाहून बाकीच्या तिघांचे उरले सुरले अवसान पण गळाले.

ते आकाशची माफी मागू लागले पण आता आकाश चांगलाच चिडला होता. त्याने तिघांना एक एक करून चांगलेच लोळवले आणि परत त्याच्या वाटेल गेल्यास तंगड्या तोडून गळ्यात घालेन असा सज्जड दम पण भरला. त्या फिल्मी स्टाईल मारामारीने बघ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. आकाश गाडीला किक मारून निघून गेला आणि एकमेकाला सावरत, रडत-कुंथत उठणाऱ्या त्या चौघांचे लोकांनी पार हसे केले. राकेशला सोबत घेऊन कसेबसे ते तिथून निघाले.