जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

मग दोघेही गाडीवर बसून घराकडे निघाले. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. नभा आकाशला पाठीमागून घट्ट मिठी मारून बसली होती. आकाशला तर आकाशच ठेंगणे झाले होते. असे वाटत होते की हा रस्ता कधी संपूच नये. पण घर जवळ येताच ती सावरून बसली. नभाला आकाश सोबत भिजून आलेले पाहून तिच्या आईचा संय्यम सुटला. ती तिला ओरडू लागली. त्या बरोबर नभाचे एकमेव आशास्थान असलेले तिचे बाबा मध्ये पडले. “अगं पोरं भिजून आली आहेत त्यांना टॉवेल वगैरे दे. आल्याचा गरम चहा व खायला काहीतरी द्यायचे सोडून ओरडतेस कसली?”

“एवढ्या पावसातून आकाशने तिला सुखरूप घरी आणले आहे. त्याचे आभार मानायचे सोडून तू हे काय आरंभले आहेस?” ते ऐकल्यावर नभाची आई थोडी नरमली. तिने दोघांना घरात येण्यास सांगितले पण “नको मी निघतो” म्हणत आकाश आपल्या घरी जाण्यासाठी वळला. त्याला अडवत नभाचे बाबा म्हणाले, “तिचे मनावर नको घेऊस, गरम चहा आणि भजी करायला सांगतो ती खाऊन पाऊस कमी झाला की मग जा.” पण आकाश थांबला नाही, “पुन्हा केव्हा तरी! घरी आई वाट बघत असेल. येतो मी.” असे म्हणुन तो निघाला.

आकाश आपल्याच धुंदीत गाडी चालवत घरी चालला होता एवढ्यात त्याला रस्त्यात गाडी आडवी लावून उभा असलेला राकेश आणि काही मुले दिसली. आकाशने गाडीचा स्पीड कमी केला आणि त्यांच्या पासून काही अंतरावर थांबला. “अरे राकेश! बऱ्याच दिवसांनी भेटतोयस. कसा आहेस? आणि असा रस्ता अडवून का उभा आहेस?” आकाशने विचारले. “माझ्या गर्लफ्रेंडला माझ्यापासून दूर करून वर मलाच विचारतोयस की कसा आहेस?” राकेश कडाडला. “म्हणजे? मी समजलो नाही तू काय म्हणतोयस ते.” आकाशला अंदाज आला होता की आता राडा होणार.