जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

एवढ्यात ऑफिसमधील टेलिफोनची रिंग वाजली आणि ते भानावर आले. आकाशच्या मिठीतुन नाईलाजाने दूर होत नभाने फोन घेतला. तो फोन सरांचा होता. ते परस्पर घरी गेले होते. त्यांनी नभाला ऑफिस बंद करून घरी जाण्यास सांगितले. आपल्या मर्यादेची जाणीव असल्यामुळे दोघेही तिथेच थांबले. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर आकाश आणि नभा बाहेर पडले. वाटेत पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. नभा आकाशला खेटूनच उभी होती. आकाशचा उष्ण श्वास तिला तिच्या गालावर जाणवू लागला तसे ती त्याच्या पासून दूर जाऊ लागली.

आकाशने पटकन तिचा हात पकडला व स्वतःकडे खेचले. नभा त्याच्या छातीवर आदळली आणि त्याच्या हातांनी तिला कवेत घेतले. नभाने कोणताच विरोध दर्शवला नाही. तिही त्याच्या मिठीत विसावली आणि तिने आपले डोके मोठ्या विश्वासाने आकाशच्या रुंद छातीवर टेकवले. त्याच्या हृदयाची धड धड तिला स्पष्ट ऐकू येत होती. शेवटी तिला त्याच्या प्रेमाचा स्वीकार करावाच लागला. दोघे प्रेमाच्या ओल्या पावसात चिंब भिजत होते.

त्या क्षणी नभाला ना तिच्या मामांचा विचार होता, ना आईचा आणि ना समाजाचा. तिने आकाशचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि त्याला म्हणाली, “आकाश मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत. मी माझ्या घरच्यांना आपल्या लग्नासाठी तयार करेन, फक्त तू आता लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहा. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.” नभाच्या या वाक्यांनी आकाशमध्ये नवा उत्साह संचारला. नभाला घट्ट मिठीत घेऊन त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले.