जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

त्याने विचारले, “पण काका तुम्हाला एवढे डिटेल मध्ये कसे माहीत? ऐकताना असे वाटले की त्या वेळी तुम्ही तिथे उपस्थित होतात की काय?” “ज्या क्षणाला त्या घरातील शक्तीने आपले अस्तित्व दाखवले त्याच क्षणाला मला जाणीव झाली की तू संकटात आहेस आणि मी सुक्ष्मरूपाने तिथे उपस्थित झालो.” काका म्हणाले. “पण मला तुमचे अस्तित्व जाणवले नाही. मला पण शिकवा ना सुक्ष्मरूपाने एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जाता येते ते!” आकाशने जोशी काकांना विनंती केली. “कशाला? कोणाच्या नकळत त्या मुलीच्या जवळ जायला?”

काकांनी आकाशच्या मनातील विचार बरोबर पकडला होता हे लक्षात येताच आकाश खजील झाला. “नाही, तसे काही नाही.” आकाश चाचरत म्हणाला. “हे बघ आकाश तुला त्या मुलीची काळजी आहे हे मी जाणतो पण ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. उद्या मोठ्या संकटात पडशील. तिच्यापासून लांब हो नाहीतर जीवावर पण बेतू शकते. ज्या मार्गावर तू चालत आहेस तो वन वे आहे. तेव्हा वेळीच सावध हो नाहीतर परत फिरणे केवळ अशक्य होऊन जाईल. बाळा मी काय सांगतोय ते समजण्याचा प्रयत्न कर. तुला मी केवळ माझा शिष्य नव्हे तर मुलगा मानतो म्हणुन सांगतोय.”

जोशी काकांचा आवाज खूप भावुक झाला होता. आकाशला त्यांच्या आवाजातील काळजी जाणवली. पण प्रेमात पडल्यावर अक्कल शेण खायला जाते हेच खरे. “सांगा ना काका! सुक्ष्म रूपात एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जाता येते? प्लिज सांगा ना, प्लिज!” आकाश खुपच आर्जव करू लागल्यावर काकांनी त्याला जुजबी माहिती दिली. “अरे ते इतके सहजसाध्य नाही. त्यासाठी खुप साधना करणे आवश्यक आहे. प्रचंड एकाग्रता आणि स्वतःवरती पुर्ण कंट्रोल असणे गरजेचे आहे. आत्मा शरीरातून बाहेर काढून पुन्हा शरीरात घालणे हे खुप कठीण असते.”