जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

आकाशला समजेना की नेहेमी खूप प्रेमाने आणि आपुलकीने बोलणारे जोशी काका आज एवढे उचकले का? तो मान खाली घालून त्यांच्यासमोर उभा राहिला. जोशी काकांचा राग आता निवळला होता तरीही ते चढ्या आवाजात त्याच्यावर खेकसले, "तू काल रात्री जो शहाणपणा केलास, तो केवढ्याला पडला असता याची तुला काही कल्पना तरी आहे का?" आपला उपद्व्याप काकांना कसा कळला याचे आकाशला खूप आश्चर्य वाटले.

“मला कसे कळले हाच प्रश्न डोक्यात घोळतोय ना तुझ्या मनात? अरे तू माझे शिष्यत्व पत्करलेस त्याचवेळी तू माझी जवाबदारी बनलास. आपल्या मध्ये एक अदृश्य बंध आहे. शिष्य संकटात सापडल्यावर जर गुरूला त्याची जाणीव झाली नाही तर तो गुरु कसला? तू स्वतःला सुरक्षा न घेता जे रेकीचे सिम्बॉल्स बनवलेस त्यामुळे तुझी सप्त चक्रे जागृत झाली होती. त्यामुळे तुला त्या घरात एका अमानवीय शक्तीचे अस्तित्व जाणवले. सुदैवाने तिने तुला काही केले नाही. पण नंतर त्या मोरीवर असलेल्या लावसटीसाठी तू एक सोपे टार्गेट होतास.”

त्या मुलीला जर ते हनुमानाचे सिद्ध लॉकेट तुझ्या गळ्यात घालण्याची उपरती झाली नसती तर काही तरी भयंकर घडले असते. कदाचित त्या लॉकेटमुळे तू वाचला असतास पण ती मुलगी मात्र नाहक बळी गेली असती. यापुढे असला आगाऊपणा करणार नाहीस असे मला वचन देत असशील तरच माझ्याकडे शिकायला ये, नाहीतर नाही आलास तरी चालेल. तुझ्या बापाला काय उत्तर द्यायचे ते मी देईन. तसाही त्याचा या सगळ्यावर विश्वास नाही." मग आकाशने जोशी काकांना वचन दिले. पण त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.