जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

“मला ती हवी आहे गं, मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय.” आकाशचा स्वर खुप हळवा झाला होता. त्यावरून आकाशच्या आईने ओळखले की आकाश नभासाठी खुप जास्त सिरियस आहे. तिने आकाशच्या वडीलांसोबत हा विषय रात्री डिस्कस करायचे ठरवले. पाऊस थांबल्यावर आकाशला सोबत घेऊन ती जोशी काकांना भेटली. तिने झालेला सगळा प्रकार जोशी काकांना सांगितला. “आकाश तर त्या मुलीमध्ये पुरता गुंतलाय. आता काय करायचं? आज तर आकाशला काही झाले नाही पण उद्या आकाशचे काही बरे वाईट झाले तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?” तिच्या स्वरात काळजी डोकावत होती.

“आकाश जरा बाहेर बस. मला तुझ्या आईसोबत काही खाजगी बोलायचे आहे.” जोशी काका म्हणाले. आकाश बाहेर गेल्यावर जोशी काकांनी आपल्या पत्नीला चहा टाकण्यास सांगितले. “हे पहा वहीनी! मी आकाशला माझ्या मुलासारखाच समजतो. आणि म्हणुनच मी त्याला आधीच सावध केले होते पण विधीलिखित कुणाला चुकत नाही. ती मुलगी खरंच खुप चांगली आहे पण योगच असे आहेत की आकाशच्या जीवाला धोका होऊ शकतोय.”

आज त्याचाच प्रत्यय आपल्याला आकाशवर झालेल्या हल्ल्याने आला. सुदैवाने त्याला काही इजा झाली नाही पण पुढे येणारी संकटे खुप मोठी असतील तेव्हा त्याने खुप सावध राहणे आवश्यक आहे. आपण त्याचे मन वळवू नाही शकणार पण तुम्ही त्याची आई असल्याने तुम्ही केलेल्या उपासनेचे बळ कठीण प्रसंगात त्याच्या पाठीशी उभे राहील. महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही रोज १ माळ करणे आवश्यक आहे त्याच बरोबर घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा जप आणि गजानन विजय पोथीचे रोज पारायण केलेत तर येणारे संकट टळणार जरी नसले तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल.

“आकाश! आत ये.” आकाश आत गेल्यावर जोशी काका म्हणाले, “आकाश मी जे सांगतोय ते नीट एक आणि त्याच प्रमाणे वाग, तुझे कल्याणच होईल. मी हा जो ताईत तुला देतोय तो सतत जवळ बाळगायचा. अमानवीय शक्तींपासून तुझे संरक्षण करण्यासाठी तो खुप कामी येईल. ह्यात तुझीच काय, कोणाचीच चूक नाही. हे तुझे प्रारब्ध आहे, तेव्हा जास्त विचार करू नकोस. पण आपली साधना मात्र न चुकता सुरु ठेव. देव तुझे कल्याण करो.” त्यानंतर चहा घेता घेता थोड्या घरगुती गप्पा झाल्यावर आकाश आणि त्याची आई तिथुन निघाली.

क्रमशः


जातबळी - कथेचे सर्व भाग