जातबळी भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २०१८
जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha
जातबळी भाग १

तो आता काय बोलतो याकडे तिचे कान लागले होते. हातातील चावीशी चाळा करत ती तिथेच खाल मानेने उभी होती. “रश्मी, हाय! मी आकाश. थर्ड ईयर बी.एस.सी ला आहे. मला तू खुप आवडतेस, तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिले त्याच क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्याशिवाय मला दुसरे काहीच सुचत नाही. सगळीकडे केवळ तूच दिसतेस. कशातही लक्ष लागत नाही, सतत तुझाच विचार मनात असतो. तू आयुष्यभरासाठी माझी साथ देशील?” एका दमात आकाश बोलून गेला. क्षणभर रश्मी काहीच बोलली नाही. नंतर तिने मान वर केली आणि म्हणाली, “मला घरी जायला उशीर होतोय. मी तुला नंतर सांगेन.”

“नंतर कधी?” आकाशचा आतुरलेला स्वर. “उद्या.” असे म्हणुन रश्मीने आपली गाडी स्टार्ट केली आणि तिथुन निघून गेली. ती होय म्हणणार याची आकाशला खात्री होती त्यामुळे तो खुप खुश झाला होता. "येऽऽऽस!" तो आनंदाने जवळ जवळ ओरडलाच. नंतर गाडीला किक मारून तोही घरी निघाला. प्रचंड टेन्शन, उत्सुकता आणि आनंदाच्या भरात हा सर्व प्रकार काहीजण दुरून पाहत आहेत याकडे त्याचे लक्षच गेले नाही. घरी पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की दुसऱ्या दिवशी रविवार होता. “शिट यार! रश्मीने मस्त येडा बनवला आपल्याला. आता सोमवारीच तिची भेट होईल. बसा आता तडफडत!” तो मनातल्या मनात चरफडला.

सोमवारी आकाश वेळेआधीच कॉलेजला पोहोचला, पार्किंगमध्ये गाडी लावल्यावर त्याने रश्मीच्या वर्गाकडे पाहिले, तिथे ती न दिसल्यामुळे त्याचे डोळे तिला कॉलेजमध्ये शोधू लागले. रश्मी कुठेच न आढळल्यामुळे त्याच्या डोक्यात शंकांचे रान उठले. तिचा नकार तर नसेल? तिची तब्येत तर ठीक असेल ना? तिच्या घरी तर कळले नसेल? अशा एक ना अनेक शंका त्याच्या मनात तांडव करू लागल्या. एवढ्यात त्याच्याच वर्गातील राकेशच्या बाईकवर मागे बसुन गेटमधून आत शिरणारी रश्मी त्याला दिसली.