जातबळी भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २०१८
जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha
जातबळी भाग १

तिचे लेक्चरमध्ये लक्षच लागायचे नाही आणि आकाश तर आधीच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता त्यामुळे त्याचीही अवस्था याहून वेगळी नव्हती. तिला पण आपण आवडू लागलो आहोत याची जाणीव त्याला एव्हाना झाली होती. आता आकाशचा धीर चेपला होता. त्या मुलीच्या वर्गातील काही मुले एन.सी.सी मध्ये त्याला ज्युनियर होती त्यांच्याकडून त्याने तिची माहिती मिळवली. तिचे नाव रश्मी सावंत असल्याचे त्याला समजले. रश्मीचा कोणी बॉय फ्रेंड नसल्याचे कळल्यावर, त्याला फार हायसे वाटले.

आता त्याला तिला पटवण्यासाठी कोणाशी कॉम्पिटिशन करावी लागणार नव्हती, त्यामुळे त्याचे काम थोडे सोपे झाले होते. एके दिवशी आकाश नेहेमी प्रमाणे पार्किंग मध्ये उभा होता. रश्मी वर्गातच होती. तिच्या मैत्रिणीने तिला दोन चार वेळा खुणावलेले आकाशने पहिले पण रश्मीने त्याच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. एकदा चुकून नजरा नजर झाली तर तिने नाक मुरडत तोंड फिरवले. आकाशला समजेना की रश्मीला अचानक झाले तरी काय? त्याने वेळ न घालवता रश्मीला प्रपोज करायचे ठरवले.

कॉलेज सुटल्यावर तो पार्किंगमध्ये रश्मीच्या गाडीजवळ तिची वाट पाहत बसला होता. इतके दिवस दुरून बिनधास्तपणे न्याहाळणारी रश्मी, आज आकाशला समोर पाहून सोबत दोन मैत्रिणी असुनही बावरली होती. तिच्या मैत्रिणी तिच्यापासून दूर जाऊ लागल्या तशी ती घाबरली. त्यांचे हात धरून त्यांना आपल्याकडे ओढू लागली, त्यांना सोबत थांबण्यास सांगु लागली. पण आकाशला रश्मीला प्रपोज करायचे आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला आकाशच्या दिशेने ढकलले आणि दूर जाऊन उभ्या राहिल्या.

गाडी पार्किंगमध्येच असल्यामुळे रश्मीचा नाईलाज झाला व ती आकाशच्या दिशेने जाऊ लागली. आधी तिची भीतीने गाळण उडालेली पाहून गालात हसणारा आकाश सुद्धा आता थोडा नर्वस झाला होता. ती त्याच्यासमोर जाऊन खाल मानेने उभी राहिली. काही क्षण कोणीच काही बोलले नाही. आकाश काही बोलत नाही हे पाहून तिने सॅक मधुन आपल्या गाडीची चावी काढली आणि गाडीकडे जाऊ लागली. तिला निघालेली पाहताच आकाश म्हणाला, "रश्मी, एक मिनिट. मला तुझ्याशी थोडं बोलायचे होते." त्याबरोबर रश्मी तिथेच थांबली.