जातबळी भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २०१८
जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha
जातबळी भाग १

परीक्षा जवळ आल्यावर तो लायब्ररीत जाऊन बसू लागला पण पंधरा मिनिटांच्यावर त्याचे लक्ष पुस्तकात लागेल तर शप्पथ. नजर पुस्तकात पण त्याचे मन मात्र भलतीकडेच विहरत असायचे. अभ्यासाचा सर्व हुरूप मावळलेला हा कॉलेज कुमार, मग अभ्यासाच्या नावावर हॉस्टेलवर जाऊन मित्रांबरोबर टाईमपास करू लागला. समुद्रावर, थिबा पॉंईंटवर, भाट्यातील सुरुबनामध्ये, टायटॅनिक पॉइंटवर, तर कधी पावस, गणपती पुळ्याला मित्रांसोबत बाईकवर फिरायला जाऊ लागला. शेवटी व्हायचे तेच झाले.

सेकंड ईयरला परत ए. टी. के. टी लागली. आकाशने उदास मनाने आता थर्ड ईयरला प्रवेश घेतला. घरातून वडीलांच्या रोजच्या शिव्या बसत होत्याच पण परिस्थिती मात्र जैसे थेच होती. अकरावीला एन. सी. सी चे फर्स्ट ईयर, एफ वाय ला सेकंड ईअर आणि एस वाय ला थर्ड ईअर पुर्ण झाल्यामुळे आता एन. सी. सी चे निमित्त देता येणार नव्हते. अभ्यास तर करावा लागणारच होता. पुन्हा लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स सुरु झाली. परीक्षेला बसण्यासाठी वर्गात ८५% हजर असणे आवश्यक असल्यामुळे शरीराने तो वर्गात असायचा पण त्याचे मन मात्र भरकटत असायचे.

आपले भवितव्य एकंदरीत अंधारमय दिसत असताना आकाशला कल्पनाही नव्हती की त्याच्या रटाळ आयुष्यात असेही काही घडणार आहे. एके दिवशी प्रॅक्टिकलच्या सरांना एच. ओ. डी नी काही महत्वाचे काम सांगितल्यामुळे त्या दिवशीचे प्रॅक्टिकल कॅन्सल झाले आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्रीच्या पुऱ्या १६ जणांच्या बॅचने नाचण्याच्या तळ्यावर पोहायला जाण्याचे ठरवले. आकाश, राहुलची वाट पाहत पार्किंगमध्ये टाईमपास करत होता. इतक्यात त्याची नजर बारावी कॉमर्सच्या वर्गाच्या खिडकीतून आत गेली. बेंचवर एक गोड मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली होती. आकाश तिच्याकडे पाहातच राहीला.

गोरा रंग, सुंदर प्रमाणबद्ध चेहरा, नितळ त्वचा, मोगऱ्याच्या कळ्यांसारखे दात, नाजुक जिवणी, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठ, काळेभोर डोळे आणि गालांना चोरटा स्पर्श करणारे तिचे मऊशार तलम केस त्याला वेडावून गेले. तिच्या आरसपानी सौंदर्याने पुरता घायाळ झालेल्या आकाशला, इतक्या दिवसात ही आपल्याला दिसली कशी नाही? नवीन ऍडमिशन तर नाही? असे प्रश्न पडू लागले. आपल्या नाजुक लांबसडक बोटांनी पेनासोबत चाळा करणाऱ्या त्या मुलीची नजर तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असलेल्या आकाशकडे गेली.