जातबळी भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २०१८
जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha
जातबळी भाग १

दुसऱ्या दिवसापासून कंटाळवाणे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सना सुरवात झाली. एक एक दिवस सरत होता पण आकाशचे लक्ष अभ्यासात लागायची चिन्हे काही दिसेनात. शाळेतून महाविद्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकासारखीच त्याच्याही मनावर हिंदी सिनेमाची भुरळ पडलेली होतीच. सिनेमात पाहिलेले कलरफुल महाविद्यालय आणि वास्तवातील महाविद्यालय यांच्यातील प्रचंड तफावत पचवणे इतरांप्रमाणेच त्यालाही खुप जड गेले.

कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला पण एखादी सुंदर मुलगी पटेल, मग आपण तिला घेऊन बाईकवर फिरायला जाऊ. मस्त रोमान्स करू या त्याच्या फिल्मी कल्पना, कॉलेजच्या रटाळ वातावरणात कुठे विरून गेल्या ते त्याचे त्यालाच कळले नाही. असे नाही की वर्गात सुंदर मुली नव्हत्या, पण कोणाशी मैत्री करणे तर दूर साधे बोलायचे धाडस पण त्याला व्हायचे नाही. मग एखादीला प्रपोज करणे तर खुप दूर राहीले. शाळेत असतानाही त्याची तीच परिस्थिती होती.

त्याच्या चुझी स्वभावामुळे त्याचे मित्रही मोजकेच होते. जे काही मित्र मिळाले ते सायन्सला असल्यामुळे अभ्यास एके अभ्यासवाले होते. त्यामुळे मित्रांबरोबर लेक्चर्स बंक करून सिनेमाला जाणे, समुद्रावर फिरायला जाणे, पोहायला जाणे, कट्ट्यावर बसून मुलींना न्याहाळणे, कॉमेंट्स करणे वगैरे काही त्याच्या नशीबात आले नाही. मुळात चंचल असलेला आकाश त्या सर्व परिस्थितीने अगदी मेटाकुटीला आला. कॉलेजला जाणे त्याला संकट वाटू लागले.

रंगाने गव्हाळ, ५ फूट ११ इंचाची मस्त उंची, योग्य डाएट आणि नियमित व्यायामाने कमावलेले मजबूत शरीर असलेला आकाश, कॉलेजमधील एन. सी. सी युनिटच्या ऑफिसर्सच्या नजरेतून सुटणे जवळ जवळ अशक्यच होते. त्याला नेव्हल एन. सी. सी मध्ये जबरदस्तीने भरती करून घेतले गेले. मग काय! पठ्ठ्याचा प्रत्येक रविवार, सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत कॉलेजच्या परेड ग्राउंडवर उन्हात प्रॅक्टिस करण्यात जाऊ लागला.