जातबळी भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २०१८
जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha
जातबळी भाग १

तु रश्मीला प्रपोज करण्याआधीच राकेशने आपल्याच वर्गातील पूजाची मदत घेतली. पूजाने रश्मीशी ओळख करून घेतली. रश्मीच्या नजरेत तुला व्हिलन आणि राकेशला हिरो बनवले. तु एक फालतू मुलगा आहेस, कित्येक मुलींचा गैरफायदा उचलला आहेस आणि जर का रश्मी तुझ्या भानगडीत पडली तर तिला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल हे तिने तिला पटवून दिले. राकेशने वेळीच तुझा डाव ओळखून रश्मीला तुझ्या जाळ्यात फसण्यापासून वाचवण्यासाठी पूजाकडे मदत मागितली, असे सांगून राकेशबद्दल रश्मीच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण केली.

रश्मीला तु आवडला होतास पण ती तुला ओळखत नव्हती. त्यात तिच्यासमोर तुझे असे निगेटिव्ह चित्र उभे केल्यामुळे ती घाबरली आणि पूजा एक मुलगी असल्यामुळे साहाजिकच तिने तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. तुझ्या एकंदर हालचालींवरून तु रश्मीला आज ना उद्या प्रपोज करणार हे राकेशने ओळखले होते. त्यामुळे तु रश्मीला प्रपोज करणार असून तिचाही इतर मुलींसारखा वापर करून सोडून देणार असल्याचे पूजाने तिला सांगितले. दुसऱ्याच दिवशी जेव्हा तु रश्मीला प्रपोज केलेस तेव्हा रश्मीची खात्री पटली की पूजाने जे सांगितले तेच खरे आहे म्हणुन. तिने जास्त विचार न करता यावर विश्वास ठेवला की तु चांगला मुलगा नाहीस.

पूजाने सांगितल्याप्रमाणे रश्मीने तुला उद्या उत्तर देते सांगून वेळ मारून नेली. रविवारी रश्मी राकेश आणि पूजाला भेटली आणि तु तिला प्रपोज केल्याचे तिने सांगितले. तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तिला पश्चात्ताप होतोय म्हणाली आणि तुझ्यापासून तिला वाचवल्याबद्दल त्या दोघांना तिने ट्रीट पण दिली. रश्मीचा आपल्यावर विश्वास बसल्याचे पाहून पूजाने तिच्यासाठी राकेश कसा योग्य आहे हे तिला पटवून दिले आणि राकेशलाही ती आवडत असल्याचे सांगितले.