जातबळी भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २०१८
जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha
जातबळी भाग १

ते पाहून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली. राकेशने विजयी मुद्रेने त्याच्याकडे पाहत, त्याच्यासमोरच गाडी पार्क केली आणि रश्मी आकाशची नजर चोरत वर्गाकडे पळाली. आकाश काय समजायचे ते समजला. केवळ एका दिवसात त्याचे नशीब फिरले होते पण कसे? ते मात्र त्याच्या लक्षात येत नव्हते. वर्गात तो सुन्न झाल्यासारखा बसला होता. आपण रश्मीला कसे प्रपोज केले, ती कसे हो म्हणाली याचे वर्णन, तिखट मीठ लावून आकाशला ऐकू जाईल अशा आवाजात राकेश सर्वाना सांगत होता. त्याचे मित्र पण त्याला आणखीन चढवत होते.

ते सगळे ऐकून आकाशच्या काळजाला काय वेदना होत होत्या, हे तोच जाणे. इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक मुलगी त्याच्या आयुष्यात येत होती तिलाही त्या राकेशने त्याच्यापासून हिरावून नेले होते हे तो सहन करू शकला नाही. हा प्रकार पाहत असलेला योगेश समजुन चुकला की आता काहीतरी आक्रित घडणार, त्यामुळे तो लगेचच आकाश जवळ आला. रागाने आकाशच्या मुठी आवळल्या जात होत्या. राकेशचे थोबाड फोडायला तो उठणार एवढ्यात योगेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आकाशच्या कानात पुटपुटला.

“आत्ता नाही. यासाठी ही वेळ योग्य नाही. तुला बरेच काही सांगायचे आहे. तुझ्या विरुद्ध काय कारस्थान शिजले याची तुला काहीच माहिती नाही. सर येत आहेत. लेक्चर संपल्यावर आपण समुद्रावर जाऊ, तिथे तुला सर्व काही सांगतो मग तुच ठरव काय करायचे ते!” आपला राग गिळून आकाश लेक्चर संपायची वाट पाहत बसला. समुद्रावर पोहोचल्यावर योगेशने मोठा सुस्कारा सोडला आणि आकाशला सर्व काही सांगायला सुरवात केली.

“त्या दिवशी आपले प्रॅक्टिकल कॅन्सल झाले होते आठवतंय? पार्किंगमध्ये तू रश्मीकडे पाहात बसला होतास. राकेश आणि त्याच्या मित्रांनी ते पाहिले होते. नंतर ते तुझ्यावर वॉच ठेऊन होते. तुझे रश्मीशी चाललेले मुक संभाषण त्यांनी पाहिले होते. तु जेव्हा रश्मीच्या मागुन तिच्या घरापर्यंत गेला होतास तेव्हा पण ते तुझ्या मागेच होते. तु रश्मीच्या विचारात एवढा गुंग झाला होतास की आजू बाजूला काय चालू आहे याचे तुला भानच नव्हते.”