दलदल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१५

दलदल - मराठी कथा | Daldal - Marathi Katha

निशाच्या तोंडुन रागिणीचे नाव ऐकताच तो तिसरा व्यक्ती अचंबित झाला. त्याने त्या माणसाला निशाला खाली उतरवण्यास सांगितले.
“तू रागिणीला कशी ओळखतेस?” असे त्याने विचारताच निशाने त्याच्याकडे पाहिले. तिची नजर त्याच्या कपाळावरील जखमेकडे गेली, आणि नकळत तिच्या तोंडुन शब्द बाहेर पडले, “राकेश!”

निशाच्या तोंडुन आपले खरे नाव ऐकल्यावर तो व्यक्ती चपापलाच. “जे नाव मी कित्येक वर्षांपुर्वीच बदलले होते ते तुला कसे माहीत? माझ्या जुन्या विश्वासु साथिदारांव्यतिरिक्त माझे खरे नाव कोणालाच माहीत नाही. तू मला कसे काय ओळखतेस? खरे सांग कोण आहेस तू?” राकेश गरजला. राकेशच्या आवाजातील भिती जाणवून निशा त्याच्या नजरेला नजर देत मंद हसली आणि म्हणाली, “घाबरलास? हिच भीती तुला रागिणीच्या प्रेमाचा विश्वासघात करुन तिला आणि अशा कित्येक रागिणींना या दलदलीत ढकलताना नाही वाटली?” निशाच्या या परखड प्रश्नाने राकेशचा चेहरा कोणीतरी सणसणीत मुस्काटात ठेऊन द्यावी तसा लाल झाला. निशाचा गळा पकडून त्याने आपली सायलेंसर लावलेली पिस्टल तिच्यावर रोखली. “तूला गरजेपेक्षा जास्तच माहीत आहे आणि तू जरा जास्तच बोलतेस. तुला मरावे लागेल”, असे म्हणत त्याने चाप ओढला.

पिस्टल मधुन सुटलेली गोळी निशाच्या कपाळापासुन इंचभर अंतरावर वेगाने गरगर फिरत होती. तो प्रकार पाहुन तिघेही चक्रावले. निशा जादुटोणा करणारी आहे असे वाटुन राकेशचे साथीदार पळून जाऊ लागले पण ते दरवाज्यापर्यंतही पोहोचु शकले नाहीत. कोपऱ्यातील एक स्टूल त्यांच्या पायावर वेगाने येऊन आदळले. त्यामुळे दोघेही हवेत कोलांटी मारून पाठीवर जोरात आदळले. धिप्पाड असलेल्या त्या दोघांची ती अवस्था पाहुन राकेश पुरता हादरला. अचानक ते दोघे हवेत तरंगु लागले आणि त्यांची तिच गत झाली जी फिरोजची झाली होती. त्यांचे रक्तबंबाळ छिन्नविच्छिन्न देह पाहुन राकेशला कापरेच भरले. त्याने निशाचा गळा सोडताच ती खोकत बाजुला झाली. तिच्या मागे उभ्या असलेल्या रागिणीला पाहुन तर राकेशच्या काळजाचा ठोकाच चुकला.

“तू जिवंत कशी? मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला टेरेसवरून खाली उडी मारताना पाहिलय. नाही, हे शक्य नाही”. असे त्याने म्हणताच हवेत थांबलेली गोळी सरसरत रागिणीच्या छातीत घुसली रक्ताची चिळकांडी उडाली आणि रागिणी धाडकन खाली कोसळली. राकेशला काय चाललय ते न समजल्यामुळे तो आणखीनच घाबरला. बावचळून तो इकडे तिकडे पाहात असताना रागिणी आपल्या भयंकर रुपात त्याच्यासमोर येऊन तरंगु लागली. काळीज गोठवेल अशा भयाकारी आवाजात हसत ती राकेशला म्हणाली, “मी तुला सोडणार नाही, राकेश! इतकी वर्ष मी तुझी वाट पाहिली आणि शेवटी तू माझ्यासमोर आलासच!”.

राकेशला वेड लागायची पाळी आली होती. त्याचा मेंदु काम करेनासा झाला होता. त्याने आपल्या पिस्टल मधुन रागिणीवर चार गोळ्या चालवल्या. सर्व गोळ्या तिच्या शरीरातून आरपार निघुन गेल्या जणु काही त्याने त्या हवेत झाडल्या होत्या. रागिणी राकेशकडे पाहात कुत्सित हसली म्हणाली, “अजुन किती वेळा मला मारणार आहेस, राकेश?” इतक्यात गोळ्यांचा आवाज ऐकुन इन्स्पेक्टर माने दरवाज्यावर लाथ मारून आत शिरले. ती संधी साधुन त्यांना धक्का मारून राकेश दरवाज्याच्या बाहेर पळाला. जिन्याने धावत तो टेरेसवर आला. दम लागल्यामुळे त्याला धाप लागली होती. त्याने टेरेसचा दरवाजा लावुन घेतला आणि दरवाज्याच्या दिशेने पिस्टल रोखुन ऊभा राहीला. टेरेसच्या दारातून आरपार जात रागिणी टेरेसवर आली. तिला पाहाताच राकेशने शेवटची गोळी झाडली ती रागिणीच्या शरीरातून आरपार गेली पण दरवाज्याच्या बिजागरावर आदळून परत फिरली आणि कठड्याच्या दिशेने धावणाऱ्या राकेशच्या बगलेत घुसली. राकेश टेरेसवर कोसळला. इन्स्पेक्टर माने, इतर कॉन्स्टेबल आणि निशा दरवाजाला धडका मारून टेरेसवर आले. इन्स्पेक्टर मानेनी राकेशला पिस्टल खाली टाकुन हात वर करण्यास सांगितले. राकेशने आपली पिस्टल मानेंच्या दिशेने रोखली आणि खुरडत पळु लागला.

“आहेस तिथेच थांब, नाहीतर गोळी घालीन!” इन्स्पेक्टर माने गरजले. राकेश थांबत नाही हे पाहाताच, मानेंच्या रिव्हॉल्व्हर मधुन सुटलेल्या गोळीने राकेशच्या पायाचा वेध घेतला. राकेश उसळून खाली पडणार तेवढ्यात रागिणीने राकेशला धरून आपल्यासोबत हवेत उंच नेले आणि वेगाने टेरेसच्या कठड्यावर फेकले. राकेश जोरात कठड्यावर आदळला आणि तोल जाऊन खाली फेकला गेला. काही सेकंदातच तो जमिनीवर जाऊन आपटला आणि त्याची प्राणज्योत मालवली. रागिणी आणि निशाच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरले. इन्स्पेक्टर माने मात्र वेड्यासारखे दोघींकडे आलटून पालटून पाहात होते.

निशाचा निरोप घेऊन रागिणी हवेत विरुन गेली. पण जाता जाता निशाला जगण्यासाठी एक ध्येय देऊन गेली. रागिणीच्या कहाणीने प्रेरित झालेल्या निशाने, रागिणीने घेतलेले व्रत पुढे सुरु ठेवण्याचा निश्चय केला. अथक प्रयत्नातून तिने एक NGO स्थापन केली जी निराधार, असहाय्य आणि फसवल्या गेलेल्या मुली व स्त्रीयांच्या मागे खंबीरपणे ऊभा राहुन त्यांना समाजात ताठ मानेने जगण्याची नवी उमेद आणि बळ देऊ लागली. ही दलदल कदाचित कधीच नष्ट होणार नाही पण प्रबोधन केल्यामुळे तिच्यात अडकणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत लक्षणिक घट होऊ शकेल. हे जेव्हा साध्य होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने रागिणीच्या आत्म्याला मुक्ती मिळेल असे निशाला वाटते. आजही तिचे कार्य अविरत सुरु आहे. ईश्वर रागिणीच्या आत्म्यास शांती देवो.