दलदल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१५

दलदल - मराठी कथा | Daldal - Marathi Katha

मी काहीच विरोध करत नाही हे पाहुन त्या तिघांनाही आश्चर्य वाटले पण त्यामुळे ते सर्व थोडे रिलॅक्स झाले होते. त्यांचे माझ्याकडे लक्ष नाही हे पाहुन मी मनाशी ठरवले की जीव गेला तरी चालेल पण आपल्या अब्रुचा लिलाव होऊ द्यायचा नाही. सर्व ताकद एकवटून मी त्यातल्या एका बेसावध पुरुषाला जोराचा धक्का मारला, त्यासरशी तो कोलमडून दुसऱ्या पुरुषावर आपटला आणि ते दोघेही खाली पडले. ती संधी साधुन मी वेगाने दारातून बाहेर पडले आणि वाट फुटेल तिकडे धाऊ लागले. समोर एक जिना दिसताच मी त्यावर चढत टेरेसवर आले, मागोमाग ते दोघे होतेच. मी पुरती अडकले होते. माझ्याकडे पाहात ते मोठमोठ्याने हसु लागले. इतक्यात राकेश पण टेरेसवर आला. त्याला पाहताच माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. तो मला पकडण्यासाठी पुढे सरसावला तशी मी जवळच पडलेली एक लोखंडी शीग त्याच्या कपाळावर मारली. त्याच्या कपाळावर खोक पडुन त्यातुन रक्त वाहू लागले, ते पाहुन ते दोन्ही गुंड माझ्या दिशेने धावले. आपली अब्रु वाचवण्यासाठी माझ्या जवळ त्या बिल्डिंग वरुन खाली उडी मारण्याव्यतिरिक्त उपायच उरला नव्हता.
“राकेश मी तुला कधी माफ करणार नाही” असे ओरडून मी स्वतःला टेरेसवरून खाली झोकून दिले. काही सेकंदातच मी जमिनीवर आदळले आणि माझी जीवनयात्रा संपली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्या नराधमांचा बदला घेण्यासाठी मी परत आले.

रागिणीची कहाणी ऐकुन निशा सुन्न झाली. तिच्या मनात चीड उत्पन्न होऊ लागली. हे कुठे तरी थांबले पाहिजे, याच्या विरोधात आपण काहीतरी केले पाहिजे असे तिला प्रकर्षाने वाटु लागले. रागिणी पुढे म्हणाली, “प्रत्येक मुलीला तिचे आई-वडील, भाऊ व घरातील इतर सदस्य आपले स्वातंत्र्य हिरावुन घेतात, बंधने लादतात, अंग पुर्णपणे झाकेल असेच कपडे घाल अशी सक्ती करतात, रात्री उशीरापर्यंत बाहेर राहण्यास मज्जाव करतात, मुलांशी बोलण्यास व भेटण्यास विरोध करतात, ते का? याच्या मागचे कारण मला खुप उशिरा समजले आणि ते म्हणजे तिची असलेली काळजी. तिच्या अल्लडपणामुळे, अजाणतेपणी तिच्यावर एखादे संकट येऊन तिचे आयुष्य बरबाद होऊ नये यासाठी असलेली त्यांची आंतरिक तळमळ. कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेलही पण त्या मागची काळजी, प्रेम आणि माया ही १००% खरी असते. मुलींना कमी कपडे घालण्यापासुन रोखण्यापेक्षा लोकांनी आपली विचारसरणी बदलली पाहिजे, स्वतःच्या मुलींना बाहेर जाण्यापासून रोखण्यापेक्षा आपल्या मुलांना स्त्रीयांचा सन्मान करायला शिकवला पाहिजे वगैरे सगळे बरोबर आहे. पण या सगळ्याला वास्तवात यायला किती वेळ लागेल ते कोण सांगु शकतो? समाजाला आपण बदलु शकत नाही, पण आपण मुली स्वतःच स्वतःला काही बंधने लाऊन घेऊन आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणात सुरक्षित तर राहु शकतो. मी जर माझ्या वडीलांचे घर सोडुन राकेश सोबत पळाले नसते तर आज माझे आयुष्य कदाचित खुप वेगळे असते. असो, माझ्या बाबतीत जे झाले ते झाले. पण इतर मुलींनी माझ्यापासून योग्य तो धडा घेतला तरी मी भरून पावेन”. रागिणी आणि निशाचे संभाषण सुरु असताना दरवाज्याजवळ खुर्ची टाकुन बसलेल्या लेडी कॉन्स्टेबलने आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांना हटकले.

आपण निशाचे नातेवाईक असुन तिला घ्यायला आलो आहोत असे त्यांनी सांगितले. लेडी कॉन्स्टेबलला संशय आल्यामुळे तिने इन्स्पेक्टर मानेना फोन केला. त्या तिघांना तिथेच थांबवायला सांगुन मानेनी ड्रायव्हरला जीप काढायची ऑर्डर दिली. तिघांपैकी एकाने त्या लेडी कॉन्स्टेबलच्या मानेवर एक जोरदार फटका मारून तिला बेशुद्ध केले आणि आवाज होणार नाही याची काळजी घेत तिला ओढत निशाच्या रुम मध्ये नेले. बाकीचे दोघेही त्याच्या पाठोपाठ आत गेले आणि दरवाजा बंद झाला. पडदा बाजुला सारुन ते तिघे निशाच्या बेडपाशी आले. “हॅलो निशा!” निशाने दचकुन आवाजाच्या दिशेने पाहिले. तिच्या वडीलांच्या मित्राने तिला ज्या व्यक्तींना विकले होते त्याच दोन व्यक्ती समोर उभ्या पाहुन ती गर्भगळीत झाली. तिने रागिणीच्या दिशेने आशेने पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. त्यांच्यातील एकाने तिला उचलुन आपल्या खांद्यावर घेतले त्याबरोबर ती ओरडली, “रागिणी, मला वाचव!”