दलदल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१५

दलदल - मराठी कथा | Daldal - Marathi Katha

“त्या एजंटचा सुरा धरलेला हात माझ्या गळ्यापासून दूर जाऊ लागला जणु काही ती शक्ती मला त्याच्यापासुन वाचवू पाहात होती. अचानक तो एजंट वेदनेने कळवळला. एक सणसणित ठोसा त्याच्या नाकावर बसला होता. तुटलेल्या नाकासह रक्तबंबाळ झालेला तो एजंट मागच्या भिंतीवर आदळला. ते पाहुन मी दरवाज्याच्या दिशेने पळाले. त्यानंतर कसाबसा उठत तो एजंट माझ्यामागे धावला. तो मला पुन्हा पकडणार एवढ्यात अचानक तो माझ्या डोक्यावरून उसळला आणि बाथरूमच्या दरवाज्यावर फेकला गेला. दरवाजा तोडुन तो बाथरूमच्या आत जाऊन पडला. बाथरूममध्ये या भिंतीवरुन त्या भिंतीवर तो वेडावाकडा फेकला जाऊ लागला. नंतर एकदा हवेत उचलला जाऊन तो बाथ टबच्या कठड्यावर जोरात डोक्यावर आदळला. त्याचे डोके फुटुन त्याचा मेंदु जवळ जवळ बाहेरच आला ते पाहुन मी बेशुद्ध झाले. किती वेळ गेला कोणास ठाऊक पण एका किंकाळीमुळे मी शुद्धीवर आले. मला आधी काही कळलेच नाही, की काय होतय. पण माझी नजर त्याच्याकडे गेली तेव्हा तो एजंट हवेत तरंगत होता आणि त्याच्या सुऱ्याने त्याचाच गळा चिरला जात होता. त्या एजंटच्या समोर एका स्त्रीची अस्पष्ट अशी आकृती होती. त्याला शेवटचे आचके देताना पाहुन ती असुरी हसली. तिने एक हिसडा दिल्यावर त्या एजंटच्या गळ्यातून रक्ताची एक मोठी चिळकांडी उडाली आणि तो गतप्राण झाला. त्या आकृतीने त्या एजंटचे मृत शरीर बाथरूमच्या दारात फेकुन दिले.”
माझ्याकडे वळुन ती म्हणाली, “तू आता सुरक्षित आहेस आणि हवेत विरुन गेली. त्यानंतरचे मला काही आठवत नाही”.

निशाची कहाणी ऐकल्यावर इन्स्पेक्टर मानेना क्षणभर सुचेना की काय बोलावे. निशाच्या कबुली जबाबावर तिच्या सह्या घेऊन ते हॉस्पिटल मधुन बाहेर पडले. निशाच्या कहाणी वर त्यांचा विश्वास बसत नव्हता, पण निशा खरं बोलत होती हे त्यांनी ओळखले होते. इतक्या वर्षांच्या अनुभवावरुन समोरचा माणुस खरे बोलतोय की खोटे हे ते लगेच ओळखत. ज्या पद्धतीने खुन झालेत त्यावरून ते खुन निशाने करणे अशक्य वाटत होते. बाहेरून कोणी आत गेलेलेही कॅमेऱ्यात दिसले नाही. निशाच्या म्हणण्यानुसार खरच एखादी अमानवीय शक्ती या खुनांच्या मागे असेल तर तिला पकडणार तरी कसे? आणि वरिष्ठाना सांगावे तर आपलीच अक्कल काढली जाईल. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही हे त्यांनी ताडले. दुर्दैवाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फक्त निशाच होती. हॉटेलच्या स्टाफपैकी कोणाला साधा आवाजही ऐकू आला नाही याचे त्यांना राहुन राहुन नवल वाटत होते. रूम सर्विसच्या वेटरने व्हिस्की, सोडा आणि तंदुरी चिकनची ऑर्डर सर्व्ह करण्यासाठी बेल वाजवली पण बराच वेळ आतुन काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मॅनेजरने डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडल्यावर झाला प्रकार उघडकीस आला होता. विचारांच्या चक्रात हरवलेल्या इन्स्पेक्टर मानेनी एका लेडी कॉन्स्टेबलला निशावर लक्ष ठेवायला सांगुन पोलीस स्टेशनची वाट धरली.

निशा हॉस्पिटल मधील बेडवर आराम करत होती. अचानक अंधारून आले आणि तोच परिचित गारवा जाणवु लागला. प्रतिक्षिप्त क्रियेने निशाचे शरीर आकसले गेले. पाय पोटाशी दुमडुन ती पडुन राहिली. आपल्या पाठीमागे कोणी तरी उभे असल्यासारखे तिला जाणवले आणि तिच्या अंगावर काटा ऊभा राहीला. तिच्या शरीरातून एक थंड शिरशिरी दौडत गेली. कुशीवर वळुन खांद्यावरून तिने मागे पाहिले आणि तिच्या काळजात धस्स झाले. ती निशापासुन ५-६ फुटावर उभी होती. उभी काय! जमिनीपासून वितभर उंचीवर तरंगतच होती. तिचे भयानक रूप पाहुन निशाने ओरडण्यासाठी तोंड उघडले पण तिच्या तोंडातून आवाजच बाहेर पडला नाही. त्या गारव्यातही तिच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. निशाला घाबरलेले पाहुन ती म्हणाली, “घाबरू नकोस मी तुला काहीही करणार नाही. जिवंत असताना मीही तुझ्यासारखीच या दलदलीत अडकले होते, पण मी तुझ्या एवढी सुदैवी नव्हते. मला वाचवायला कोणी आले नाही. वासनेची शिकार होण्यापेक्षा मी मृत्यु पत्करला. मरताना मला ज्याने फसवले त्याचा आणि आपल्या सारख्या असहाय्य मुलींना फसवुन जे लोक या दलदलीत ढकलतात त्या सर्वांचा बदला घ्यायच्या माझ्या तीव्र इच्छेने मला मृत्युनंतरही जिवंत ठेवले. तुझ्यासारख्या अनेक निरागस आणि निष्पाप मुलींना या नाराधमांपासुन मी आजपर्यंत वाचवत आले आहे. पण दुर्दैव हे आहे की रक्तबिज राक्षसाप्रमाणे एकाला मारले की कोणी ना कोणी त्याची जागा घ्यायला येतोच. मी आता थकले आहे. हे दुष्टचक्र कधी संपणार ते त्या ईश्वरालाच ठाऊक”.