दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

मानसीची आई खूप शांत वाटली. त्यांचं मानसीच्या बाबांसमोर काही चालत नसावं असंच वाटत होतं. मानसीच्या बाबांचीच सत्ता त्यांच्या घरात होती असेच एकंदरीत वाटत होते.

“हे कोण आहेत? ते तुला ओळखतात असे म्हणताहेत. हे इथे कशासाठी आले आहेत? ते सुद्धा स्वतःच्या आईला घेऊन. काय भानगड आहे ही?” असे त्यांनी दरडावूनच मानसीला विचारले.

मानसी घाबरत घाबरत बोलायला लागली.
"बाबा ते... ते... हा... माझा मित्र आहे. मी ह्याला गेल्या दोन - तीन वर्षांपासून ओळखते.”
“पुढे काय?” असे त्यांनी मोठ्या आवाजातच विचारले.
बाबा ते... ते...
“त त प प करू नकोस. काय ते स्पष्ट सांग.” मानसीचे बाबा चढ्या आवाजात म्हणाले.
“आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हांला लग्न करायचे आहे.”

तिच्या बाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, ते मानसीच्या थोबाडीत लगावणार, एवढयात मी त्यांचा हात एका हाताने घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यातुन रागाच्या ज्वाला बाहेर पडत होत्या.

“हे बघा भाऊ, ह्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत.” आईने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
“तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. मी हिचा बाप आहे, मी काय वाट्टेल ते करीन माझ्या मुलीसोबत. तिच्यावर हात उचलेन नाहीतर तिला दरीत ढकलून देईन. तुम्ही कोण मला विचारणाऱ्या?”
माझ्या आईला बोललेले मला सहन झाले नाही. मी त्यांना रागातच म्हणालो, “काहीही झालं तरीही मी मानसीशीच लग्न करणार.”
“तू कोण कुठला? तुझी महिन्याची कमाई किती? तुझी लायकी आहे का माझा जावई व्हायची?” मानसीचे बाबा चढ्या आवाजातच बोलत होते.
माझी कमाई कितीही असली तरीही मी मानसीला जे सुख, जे प्रेम देऊ शकतो, ते दुसरी कुठलीही व्यक्ती देऊ शकत नाही.” असे मी त्यांना ठणकावून सांगितले.