दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. आम्ही ह्या ना त्या कारणाने एकमेकांना भेटू लागलो. एकमेकांना नुसते पहायलादेखील जीव वेडापिसा व्हायचा. रेल्वे प्लॅटफॉर्मवर एवढ्या गर्दीत माझी नजर फक्त तिलाच शोधायची आणि ती भेटल्यावर होणारा आनंद काही वेगळाच असायचा. रेल्वे येईपर्यंत झालेली ती पाच मिनिटांची भेट सुद्धा हृदयाला समाधान द्यायची.

इतरांच्या नजरा चुकवून भेटण्यात पण काय मजा असते ना. मला तर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होतं.

आमची भेट झाली कि आम्ही खूप गप्पा मारायचो. एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल साठवलेले प्रेम पाहायचो. ही भेट लवकर संपूच नये असे वाटायचे. ही वेळ, हे क्षण इथेच थांबून राहावेत असेच वाटायचे. पण हे घड्याळ सतत धावत राहायचे आणि हिरमोड करायचे. कधी कधी भांडणेदेखील होत. भांडण संपले कि त्या नंतर मी अजून तिच्या प्रेमात पडायचो. प्रेमाच्या अशा प्रत्येक पायरीवर पाय ठेवीत आम्हा दोघांचा प्रवास चालू होता.

आमच्या प्रेमाच्या प्रवासाला आज दोन वर्षे झाली. आता दोघांची वये वाढली होती. मला नोकरीत बढती मिळाली होती. मानसीच्या घरीदेखील लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते.

मी मानसीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मी आईशी या विषयावर बोललो. आईने सुद्धा होकार दिला. मी आईला मानसीबद्दल सगळे सांगितलेच होते. माझा निर्णय आईला आवडला होता. आईची आणि मानसीची भेट सुद्धा करून दिली होती, तेव्हा आईला मानसी आवडली होती. तिने तिचा ‘सून’ म्हणून स्वीकार केला होता.