दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

मी तिला घाबरतच विचारले,
“तुला, आवडले नाही का?”
ती वेड्यासारखी हसायला लागली. मला तर काहीच कळत नव्हते. मी तिच्या चेहऱ्याकडेच पाहत राहिलो. तिने माझ्या प्रश्नाला होकार दिला.
“माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य घालवायला आवडेल.”
तिच्या उत्तराने तर मला आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

“मित्र म्हणून तू मला आवडायचास. माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू माझी साथ दिलीस. काही काळानंतर मी तुला माझ्या जोडीदाराच्या रूपात पाहू लागले. पण कधी विचारायची हिंमत झाली नाही. आज तू माझ्या मनातले बोललास.”

एकमेकांना प्रेमाची कबुली देऊन तिथून निघायचे ठरवले. घड्याळाचे काटे भराभर धावत असताना माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. उशीर झाला होता. आठ वाजले होते. दोघांचाही पाय तिथून निघत नव्हता, अजून थोडा वेळ थांबावे असेच वाटत होते. पण वेळेचे बंधन आम्हाला तसे करू देत नव्हते.
“आता आपण निघूया. नाहीतर माझ्या घरी आकांडतांडव सुरु होईल.” असे मानसी म्हणाली.
“माझी पण आई घरी वाट बघत असेल. सर्वात आधी ही गोष्ट मी माझ्या आईला सांगणार.”
मानसीने लाजत मानेने होकार दिला.
“तुझ्या घरी बरं आहे, तू मोकळेपणाने तुझ्या आईशी आपल्याबद्दल बोलू शकतोस.”