दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

माझं मन मला सांगत होतं की, माझी मानसी माझा कधीच विश्वासघात करणार नाही. मी कसाबसा घरी पोचलो. घरी पोचताच आईने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

“अरे कुठे होतास तू? रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही. तुला फोन करतेय तर तुझा फोन सुद्धा लागत नव्हता.”
“रात्रभर तू घराबाहेर होतास, मानसीला आणायला गेला होतास ना? कुठे आहे ती?” मी आईला मिठी मारून रडायला लागलो.
“आई मानसी आलीच नाही.” मी रडत रडतच आईला सांगत होतो.
“अरे देवा, मग आहे कुठे ती?”
“माहित नाही.”
“म्हणजे?”
“तिच्या घरी पण जाऊन आलो. ती तिथे पण नव्हती. काहीच कळत नाही आहे. आई मी जातो, तिला शोधून येतो.”
“एवढ्या रात्री तू कुठे शोधणार तिला? आता तू तणावात आहेस. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा तू सकाळीच जा. कदाचित ती घरीसुद्धा गेली असेल.”
“जरी ती घरी गेली तरी, आता तिचे बाबाच तिला घरात घेणार नाहीत. जेव्हा मी तिच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला ‘ती आमच्यासाठी मेली’ असे सांगितले. आई मी परत मानसीला शोधायला चाललोय. तू काळजी करशील म्हणून तुला सांगायला आलो होतो. माझी वाट बघू नको आणि काळजीदेखील करू नकोस. मला माझं मन सांगतंय, मानसी कुठल्या तरी संकटात आहे. तिला मला शोधायलाच पाहिजे. तिला माझी गरज असेल.” माझं दुःख आईला बघवत नव्हते. तिच्या डोळ्यातुन अश्रू ओघळू लागले. मी तिचे अश्रू पुसले.

“तुझा मुलगा एवढ्यात हार मानणार नाही. मी खंबीर आहे या संकटाला सामोरे जायला.” असे म्हणून मी निघालो.