दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

मी मानसीची वाट बघत गणपतीच्या मंदिराकडेच उभा होतो. खूप वेळ झाला, अजून कशी आली नाही हि? याच विचारात होतो. अकरा वाजून गेले होते. साडे अकरा झाले... बारा वाजले.... एक वाजला.... अशा प्रकारे मी सकाळ होईपर्यंत तिथेच होतो. मानसीचा काहीच पत्ता नव्हता. काय झालं असेल या विचारात मी तळमळत होतो. काहीच सुचत नव्हते. मी तिच्या घरी गेलो.
“मानसी कुठे आहे?” असे मी रागात तिच्या बाबांना विचारले. तिच्या बाबांनी माझ्या खाड्कन एक कानाखाली वाजवली.
“तीला पळवून नेलंस तू आणि हे तू आम्हालाच विचारतोस?”
“आता ती आमच्यासाठी मेली. तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही.” असे म्हणून त्यांनी मला घरातून हाकलून दिले आणि खाड्कन दार माझ्या तोंडावर आदळले. डोक्याला मुंग्या आल्या होत्या. काहीच कळत नव्हते.

मानसी घरी नाही. मला भेटली नाही. मग गेली कुठे?

मी एकटक कुठे तरी बघत चालत होतो. समोरून गाड्या येताहेत याचेदेखील भान नव्हते मला. एका माणसाने मला अपघात होण्यापासून वाचवले. डोक्यात फक्त एकच विचार मानसीचा... सगळंच उध्वस्त झाल्यासारखे वाटत होतं.