दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

सुंदर संध्याकाळ. निळाशार समुद्र. सूर्याच्या मावळत्या किरणांनी आकाशाला लाल रंगाची चादर पांघरली होती. किनाऱ्यालगत असणारी माडाची झाडे वाऱ्याच्या झोताने स्वतः तिथे असल्याचा पुरावा देत होती. पहाराच देत होती जणू. किनाऱ्यालगत असणाऱ्या उंचच उंच इमारती समुद्राकडे डोळे वटारून पाहत होत्या. समुद्रातील लाटा संथपणे एकमेकींच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होत्या. समुद्रकिनारी आलेले समुद्रपक्षी आपल्या इवल्याश्या पावलांनी थुई थुई नाचत होते. गार वारा अंगाला नुसता झोंबत होता. थंड वाळू पायाला स्पर्श करीत होती. वाहणाऱ्या वाऱ्याचा झोत काही केल्या कमी होत नव्हता. अंगावर शहारे आणणाऱ्या थंडीत मी तिची वाट पाहत बसलो होतो. वाळूवर रेघोट्या मारीत वेळ कसा तरी घालवण्याचा प्रयत्न करीत होतो.

“आज एकदाचे विचारूनच टाकीन तिला” असं मनाशी पक्क केलं होतं. हृदयाची धडधड वाढत चालली होती.

मानसी तिचे नाव. चंद्रालाही लाजवेल असा सुंदर चेहरा, गोरे गोरे गाल, गुलाबाच्या पाकळीसारखे गुलाबी ओठ, लांबसडक केस, सडपातळ बांधा. केसाची एक बट सतत तिच्या गालावर ओघळत असते. डोळे तर एवढे सुंदर कि त्यांच्याकडे एकटक पाहत रहावं. बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मन अगदी प्रसन्न करतात. हसताना तिच्या गालावर पडणारी खळी माझं लक्ष वेधून घेते. कपाळाच्या मध्यभागी असणारी चंद्रकोर तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकते.