चांदण्यात फिरताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना - मराठी कथा | Chandanyat Phirtana - Marathi Katha - Page 4

आता स्मिताला रोजच उशीर व्हायचा. मुद्दाम नाही. निघायच्या वेळेसच काहीतरी काम यायचं आणि रोज तिला चालतच जावं लागायचं. रोज ती त्या दिव्याखाली थांबायची. मग “तो” यायचा आणि दोघे गप्पा मारत मारत आपापल्या घरी जायचे. असं जवळपास महिनाभर चालू होतं. मधेच ती लवकर घरी गेल्याने त्यांची भेट झाली नव्हती. चांगली ओळख झाली होती त्यांची.
“अगं, हल्ली तू रोज उशिरा जातेस घरी. भीती नाही वाटत का तुला?”, स्मिताच्या हॉस्पिटल मधल्या मैत्रिणीने तिला विचारलं.
“भीती कसली? आणि मला एक मित्र सुद्धा भेटला आहे.”
“कोण गं?”
“अगं त्याचा आणि माझा एकच रस्ता आहे. फक्त माझं गाव आधी येतं. त्याचं जरा पुढे आहे.”
“Ok. नाव काय. विचारलं नाहीस का?”
“हो. सांगते थांब. यश नाव आहे त्याचं. इकडेच पुढे ऑफिस आहे त्याचं. Engineer आहे. तिकडे मोठ्या पोस्टवर आहे.”
“हं... हुशार आहे वाटते.”
“हो. छान आहे दिसायला आणि स्वभाव सुद्धा छान आहे.”
“मी कुठे विचारलं तुला कसा दिसतो ते? प्रेमात पडल्या वाटते madam.”
“चल गं.. काहीतरी काय?” लाजली स्मिता. खरचं तिला आवडायला लागला होता तो. यश सुद्धा तसाच होता, कोणालाही आवडेल असा. स्मिता आता काम नसेल तरीही उशीराच निघायची आणि त्याची वाट पाहत थांबायची. यश येतो आहे हे तिला लांबूनच कळायचे. त्यादिवशी सुद्धा ती उशीराच निघाली. त्याच ठिकाणी येऊन पोहोचली. त्या वाटेकडे जाणार इतक्यात...
“ए बाय, थांब.” असा आवाज आला मागून. मागे बघते तर एक म्हातारी होती.
“काय झालं आजी?” तिने विचारलं,
“अगं बाय, तिकडून कुठं चालली व्हतीस. या इकडनं जा.”
“आजी माझी रोजची वाट आहे ती.”
“गे बाय, नगं जावू तिकडनं. भूत हाय तिकडं.” अस म्हणत ती गेली भरभर निघून. स्मिताही थांबली नाही मग. दिव्याजवळ येऊन यशची वाट बघत राहिली. यश आल्याबरोबर ती त्याच्याबरोबर चालू लागली.
“काय आज गप्प गप्प?” यशने स्मिताला विचारले,
“नाही रे असंच.”
“काहीतरी आहे. मला सांग काय झालं?”
“तुझा भूत, आत्मा यांवर विश्वास आहे का?” तसा यश थांबला.
“वेडीच आहेस गं तू” आणि मोठयाने हसायला लागला.
“हसायला काय झालं तुला?”
“अगं, तू doctor आहेस ना. मी engineer आणि भुतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस तू म्हणून हसायला आलं मला. पण मधेच कुठे आलं भूत?” यशने स्मिताला विचारलं.
“नाही रे, तिकडे एक म्हातारी भेटली होती. ती बोलली. इकडून जाऊ नकोस. भूत आहे तिकडे.” यशला पुन्हा हसायला आलं.
“वेडी गं वेडी, भूत असतं तर त्याने मलाच पकडलं असतं ना पहिलं कारण तुझ्या अगोदर पासून मी प्रवास करतो इकडून. काही नाही गं. गावातली माणसं जरा अंधश्रद्धाळू असतात. त्यांना काही भास झाला तरी भूत आहे असं म्हणतात. बाकी काही नाही. भूत वगैरे काही नसत. ते त्यांच्या मानण्यावर असतं सगळं.” तशी स्मिता शांत झाली. अचानक कुठूनतरी एक घुबड तिच्या डोक्यावरून उडत गेलं. स्मिताने यशचा हात घट्ट पकडला.
“एक सांगू का तुला?”
“सांग ना.”
“मला एक मराठी गाणं आठवलं लगेच.”
“कोणतं?” स्मिताने विचारलं.
“चांदण्यात फिरताना.. माझा धरलास हात..” आणि यश पुन्हा हसायला लागला.
“गप रे.”
“काय गप्प. आज अमावस्या आहे. वर आभाळात चांदण्या आहेत आणि तू माझा हात पकडला आहेस. मग तेच गाणं आठवणार ना.” तशी स्मिता हसली. बोलता बोलता आपापल्या घरी कधी आले ते कळलंच नाही स्मिताला.