चांदण्यात फिरताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना - मराठी कथा | Chandanyat Phirtana - Marathi Katha - Page 3

स्मिताने मागे वळून बघितलं. एक मुलगा उभा होता. उंच, गोरापान, मजबूत शरीरयष्ठी, पाणीदार डोळे आणि तेजस्वी चेहरा. वय असेल २७-२८ च्या आसपास. अगदी राजबिंड व्यक्तिमत्व.
“Hello madam, काय झालं तुम्हाला? कशाला रडत आहात? काही मदत करू का?” आणि स्मिता भानावर आली.
“हं... हो.. मी रस्ता चुकले आहे. इकडे नवीन आहे मी आणि इकडे कोणीच नव्हते. घाबरले मी आणि रडायला आलं मला.”
“घाबरू नका तुम्ही. कुठे राहता तुम्ही?”
“तिथे कुंभार गाव आहे ना तिथे सरकारी क्वॉर्टर्स मध्ये राहते मी.”
“ठीक आहे. मी पण तिकडूनच जात आहे. पाहिजे तर तुम्ही येऊ शकता माझ्या बरोबर.” स्मिताने त्याला निरखून पाहिलं. छान असा कडक इत्री केलेला निळ्या रंगाचा शर्ट, त्यावर लाल रंगाची टाय, पांढऱ्या रंगाची trouser, polish केलेले शूज आणि खांद्यावर Laptop ची मोठी bag.” चांगला माणूस वाटतो, निदान सोडेल तरी घरी आपल्याला”, असा विचार करून ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली.
“तुम्ही नवीन असूनही या वाटेवर कशाला आलात? इथून कोणी जात नाही सहसा. सकाळी वेगळी गोष्ट आहे. पण रात्री कोणी नसते इथे. “Actually, माझी बस miss झाली आणि बैलगाडीतून इकडे आले. लवकर पोहोचण्यासाठी short-cut घेतला आणि वाट चुकले. पण तुम्ही कसे या वाटेवर. कोणी येत नाही असं म्हणता तुम्ही. मग तुम्ही कसे?” स्मिताने उलट प्रश्न केला. त्यावर तो हसला.
“माझी हीच वाट आहे. मला short-cut घ्यावाच लागतो. माझं गाव तुमच्या गावापेक्षा अजून खूप लांब आहे आणि मला भीती वाटत नाही त्यामुळे मी इथूनच जातो नेहमी.”
“त्यात आज अमावस्याही आहे ना. चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता वाटेवर.” स्मिता चालता चालता म्हणाली.
“नाही. तिकडे तरीही काळोख असतोच. पण अमावस्येचा एक फायदा असतो.”
“कोणता?”
“वर आकाशात बघा जरा.” तिने चालता चालताच वर पाहिलं. असंख्य तारे लुकलुक करत होते. असं दृश्य ती पहिल्यांदाच बघत होती. शहरात सगळीकडेच प्रकाश पसरलेला असतो. चंद्रच असतो फक्त आभाळात. पण गावात तसं नसत ना. ती बघतच राहिली आभाळाकडे.
“किती चांदण्या - तारे आहेत. बापरे..!” आश्चर्याने बोलली स्मिता. तशीच चालत होती ती.
“चला madam, तुमचं गाव आलं”.
“अरे हो, कळलंच नाही चांदण्यांकडे पाहता पाहता आणि तुम्ही कुठे चाललात?”
“माझा हा रस्ता, तुमचा तो. मी जातो या रस्त्याने. सांभाळून जावा घरी.”
“Ok ... thanks” म्हणत तिने त्याचे आभार मानले आणि एकदाची घरी पोहोचली ती.
“किती बरं झालं ना तो भेटला ते, नाहीतर कशी आले असते घरी मी.” मनातल्या मनात स्मिता बोलली, चालून चालून दमलेली स्मिता लगेचच झोपी गेली.

पुढच्या दिवशी हॉस्पिटल मध्ये कामात गढून गेली. संध्याकाळी तेच झालं, उशीर. पुन्हा धावाधाव. पुन्हा बस सुटली. यावेळी कालचा बैलगाडीवालादेखील नव्हता. पायी पायी चालत चालत थोडयावेळाने ती त्या ठिकाणी येऊन पोहोचली. दोन वाटा. कोणती निवडू? वेळ पण खूप झालेला. स्मिता त्याच वाटेने निघाली पुन्हा. कालचीच वेळ. वाट निर्मनुष्य. आभाळात चांदण्या - तारे. बस..! बाकी कोणी नाही. कसलेसे आवाज येत होते. मधेच एक कुत्रा कुठेतरी लांब ओरडायचा. घुबड काळोखातून आवाज करायचा. भीतीदायक वातावरण अगदी. काय करावं सुचेना. पुन्हा ती दिव्याखाली जाऊन उभी राहिली. थोडयावेळाने थंड हवेची झुळूक आली, सोबत मोगऱ्याचा छान सुगंध. लगेच तिने त्या दिशेने पाहिलं. पुन्हा तोच कालचा ओळखीचा चेहरा.
“काय madam, आज पण रस्ता चुकलात वाटते. दुसऱ्या वाटेने जायचे ना घरी.” त्याने येतायेताच सांगितले.
“रस्ता नाही चुकले पण जराशी भीती वाटली म्हणून इकडे उभी राहिले.”
“चला मग. जास्त थांबू नका इथे.” तसे ते दोघे निघाले.
“तुमची काय हीच वेळ आहे का घरी जाण्याची?”
“तसं काही नाही पण बहुतेक याच वेळेस जातो मी घरी.” तिने लगेच घड्याळ बघितलं, संध्याकाळचे ७.३० वाजले होते.
“तुमचं गाव येवढ्या लांब आहे मग एखादी गाडी वगैरे नाही आहे का?”
“नाही आणि गावात कुठे इंधन मिळते गाडीसाठी? त्यापेक्षा चालल्याने व्यायाम सुद्धा होतो ना. मग गाडीची काय गरज?” चालता चालता असे वेगवेगळे विषय निघत होते. वेळ कधी गेला ते कळलच नाही. “चला. तुमची वाट आली समोर. बाय..!” असं म्हणून तो निघून गेला.