चांदण्यात फिरताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना - मराठी कथा | Chandanyat Phirtana - Marathi Katha - Page 2

स्मिता आणि यशची ओळख तशी ६ महिन्यांपूर्वीची. स्मिता Actually मुंबईत राहणारी, डॉक्टर होती ती. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई मध्येच एखाद्या मोठया आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळेल असं तिला वाटत होतं आणि तसं झालं ही. मुंबईत मोठया हॉस्पिटलमध्ये तिला job मिळाला पण तो आनंद फक्त तीन महिनेच टिकला. कारण त्या हॉस्पिटल मधून कोल्हापूरला गेलेली एक महिला डॉक्टर आजारी पडली म्हणून तिची जागा भरून काढण्यासाठी स्मिताला तिकडे पाठवलं गेलं.
“काय वैताग आहे, मला कशाला पाठवत आहेत?” स्मिता रागातच तिच्या मैत्रिणीशी बोलत होती.
“अगं, त्यात काय रागवायचे. तू नवीन आहेस म्हणून तुझं नाव पुढे केलं आणि तुला चांगला अनुभव मिळेल ना गावात सुद्धा."
“ठीक आहे गं. पण तिला काय झालं नक्की?”
“माहित नाही. कोणालाच माहित नाही आणि कोणी सांगतही नाही बरोबर. सरांकडून ऐकलं जरासं कि ती वेडी झाली”.
“वेडी?”
“अगं म्हणजे तशी वेडी नाही. मानसिक धक्का बसला आहे असं म्हणतात”.
“म्हणजे मी पण वेडी होणार.” आणि दोघीही हसायला लागल्या. आठवड्याने तिला कोल्हापूरला जायचं होतं. जरा वाईटच वाटत होतं तिला. गावात कधीच गेली नव्हती ती अगदी लहानपणापासून. लहानाची मोठी ती शहरातच झाली होती. “पण ठीक आहे” असं म्हणत ती कोल्हापूरला दाखल झाली. तिकडे तिची राहण्याची व्यवस्था सरकारी क्वॉर्टर्स मध्ये केली होती. प्रोब्लेम तर वेगळाच होता. हॉस्पिटल आणि तिची रूम यामध्ये खूप अंतर होतं. हॉस्पिटलच्या आजूबाजूस कोणतीच व्यवस्था नव्हती. तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. जशी तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुरुवात केली तसे वेगवेगळे प्रश्न समोर यावयास लागले. गावातली वस्ती तेवढी सुधारलेली नव्हती. एकच शाळा होती तीसुद्धा मोडकळीस आलेली होती. कच्चे रस्ते, वाहन जवळपास नाहीच. प्रवास चालायचा तो बैलगाडीतून. एकदोघांकडे सायकल होत्या. सरपंचाकडे तेवढी गाडी होती, तीसुद्धा कधी कधीच घराबाहेर यायची. S.T. च्या बसेस यायच्या गावात ठरलेल्या वेळेत. सकाळी ६.३०ला आणि संध्याकाळी ५ला. काळोख होण्याच्या आत. गावात वीज तर नुकतीच आली होती, तीपण लोड-शेडींग असलं कि रोज ५ तास जायची. फक्त स्मिताच्या रूमची वीज असायची कारण ती सरकारी घरात रहायची म्हणून. रस्त्यावरती दिवे होते पण दिव्यांची संख्या खूप कमी होती.

एक दिवा इथे तर दुसरा खूप लांब असायचा. त्यामुळे रस्त्यावर प्रकाश तसा नाहीच. बरं.. हॉस्पिटल जवळ घर बघावं तर तिथे सगळे रूम अगोदरपासूनच बुक झालेले. त्याहून तिकडे पैसे जास्त. मग तिने तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. रोज ती लवकर निघायची घरी जाण्यासाठी. बस सुद्धा वेळेवर असायची ना. एका दिवशी मात्र तिला निघायला वेळ झाला. धावतच ती बाहेर आली. तर तिला तिची बस जाताना दिसली.
“आता काय करायचं? पुन्हा हॉस्पिटल मध्ये जाऊया का?” हॉस्पिटल मध्ये कोणीच थांबत नव्हतं. त्यामुळे तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नव्हता. तसंच तिने पायी पायी जाण्याचा निर्णय घेतला. स्मिताला रस्ता माहित होता. परंतु तोच रस्ता बरोबर आहे कि नाही याची शंका होती. तेवढयात एक बैलगाडी येताना दिसली.
“काय व्हो, कोनीकडं चालता आहात वो बाई?”
“अहो मला गावात जायचे आहे, बस सुटली माझी.”
“मंग, एकटया जावू नका. बसा. म्या सोडतो तुमाला.” तिला बरं वाटलं. हळूहळू करत बैलगाडी एका ठिकाणी येउन थांबली.
“बाई, इकडून तुमाला एकटीला जावं लागेल. माजी वाट दुसरी हाय.” नाईलाजास्तव तिला उतरावं लागलं.
“मी कुठून जाऊ आता?”
“दोन वाटा हायत. हि एक सरल वाट हाय, पन तिकडून कोनी जात नाय. दुसरी वाट हाय ती मोठी हाय. तिकडं असत्यात लोकं तिकडून जावा. बरा! म्या निगतो हा सांभाळून जावा.” अस म्हणत तो निघून गेला. दोन रस्ते होते. एक मोठा आणि दुसरा short -cut. खूप वेळ सुद्धा झालेला. “काय करूया. short -cut घेऊया.” असा विचार करून स्मिता short -cut ने निघाली.

बैलगाडीवालाच्या बोलण्याप्रमाणे कोणीच नव्हते तिथे, एकटीच चाललेली होती. दिवे होते लांब लांब. नशीब तिच्याकडे torch होता. मिट्ट काळोख. त्यात भर पडली ती अमावस्येची. चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता. त्यातून कसले कसले आवाज येत होते. गावात पहिली कधीही न आलेली आज एकटी चालत होती काळोखातून. प्रचंड घाबरलेली. अचानक कुठून तरी एक कुत्रा भुंकत आला. तशी ती धावतच सुटली आणि रस्ता चुकली. कुत्रा तर गेला कुठेतरी. “आता कुठे जायचे?” विसरलीच ती. आजूबाजूला कोणीच नाही. काळोख सगळीकडे, mobile ला रेंज नाही. तिला रडूच आलं. दिव्याखाली ती रडत बसली. ५-१० मिनिटं झाली असतील. एकदम थंड हवेची झुळूक आली. हवेच्या झोताबरोबर मोगऱ्याचा सुगंध आला. छान वाटलं तिला आणि मागून आवाज आला, “Excuse me, मी काही मदत करू का तुम्हाला?”