चांदण्यात फिरताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना - मराठी कथा | Chandanyat Phirtana - Marathi Katha

अडचणीत धावून येणार्‍या अगदी राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या तरूणाच्या अस्तित्वाचा उलगडा करणारी ही कथा अंगाचा थरकाप उडवणारीच आहे...

“आज उशीर केलास तू? कूठे होतास? कधीची वाट बघते आहे तुझी." स्मिताने यशला आल्याआल्याच विचारलं. थोडीशी रागावलीच ती.
“अगं, काम होतं थोडं. बॉसनी सोडायला नको म्हणून थोडासा उशीर झाला” तरीही ती रुसलेलीच होती. यश सुद्धा मग तसाच बसून राहिला तिच्या शेजारी. थोडावेळ असाच गेला.
“बोल ना काहीतरी. गप्प का झालास?”
“तू बोलतच नाही आहेस आणि मी एकटाच बडबड करत आहे. लोकांना वाटेल मी वेडा आहे.” तशी स्मिता हसली.
“काय छान सुगंध येतो आहे?” स्मिता म्हणाली.
“मोगऱ्याची फुलं आणली होती, आता तू रागावली आहेस, मग यांचा काय उपयोग देतो टाकून.”
“नको. नको. वेडा आहेस का? मला आवडतात ती.” असं म्हणत तिने स्वतःहूनच फुलं घेतली.
“काय रे, तुझ्या ऑफिसमध्ये मोगऱ्याचं झाड - बीड आहे वाटते.”
“हो गं, ऑफिसच्या बाहेर एक झाड आहे मोगऱ्याचं. कोणी हात लावत नाही त्याला. मग मीच ती फुल घेऊन येतो तुझ्यासाठी.”
“अरे, पण फुलं तर सकाळचीच फुलतात ना? मग तुला कुठून भेटतात ही फुलं? जादूचं झाड आहे वाटते. बघितलं पाहिजे एकदा.”
“तसं काही नाही गं जादू - बिदू. कळ्यांना सांगतो मी आपल्याला स्मिताला भेटायला जायचे आहे की फुलतात ती आपोआप.” तशी स्मिता लाजली.
“मुलींना इम्प्रेस कसं करावं हे तुझ्याकडून शिकावं ना.” स्मिता म्हणाली, तसं यशला हसायला आलं. त्याचबरोबर छान थंड हवेची झुळूक आली.
“मघापासून किती उकडत होतं. तू आलास आणि सगळं कसं छान थंड थंड झालं. मी observe केलं आहे खूपदा कि तू आलास कि छान गार गार वारा सुटतो, आजुबाजूचं शांत शांत होते. कसं काय रे..?”
“त्याचं काय आहे, निसर्ग जरा जास्तच खुश असतो नेहमी माझ्यावर आणि तू असल्यावर तर असं होणारच ना जादू केल्यासारखं.”
“मी काय जादुगार आहे?”
“मग, माझ्यावर नाही केली आहेस का जादू?”
“गप्प रे, काहीही बोलतोस.” तिला हसायला आलं.
“अजून एक गोष्ट, आज सुद्धा मोगऱ्याचा सुगंध आला. तू येण्याआधी मोगऱ्याचं अत्तर लावतोस वाटते. हो ना?” तो नुसताच हसत होता. “आणि तुला गेल्यावेळेस विचारलं होतं, त्याचं उत्तर अजूनही नाही दिलंस मला."
“कोणता प्रश्न?"
“दर पोर्णिमेला तू गायब असतोस आणि अमावस्या असली कि तुझा चेहरा जास्तच उजळत असतो, मेकअप वगैरे करतोस का अमावस्येला?”
“चंद्राला लाज वाटू नये म्हणून मी पोर्णिमेला बाहेर पडत नाही आणि अमावस्या असली कि मी जास्त उजळत असतो ना म्हणून चंद्र येत नाही.” “सांग ना रे”, स्मिता लाडातच म्हणाली.
“खर तर आमचा बॉस आहे ना तो जरा भित्रा आहे आणि अंधश्रद्धाळू. पण त्याला कोणीतरी सांगितलं आहे कि पोर्णिमेला केलेली कामं फायदा करून देतात म्हणून तो सगळ्यांना थांबवतो रात्रभर आणि अमावस्या आली कि तो दुपारीच पळतो घरी. त्यामुळे आम्ही सगळे मोकळे असतो. त्यादिवशी काहीच tension नसते म्हणून तुला माझा चेहरा उजळतो आहे असं वाटत असेल.”
“असेल असेल तसच काहीतरी." स्मिता म्हणाली.
“अरेच्या... बोलता बोलता कधी आपल्या वाटेवर आलो ते कळलंच नाही." यशच्या बोलण्याने स्मिता जागी झाली.
“हो रे..! कळलंच नाही."
“चल बाय. उद्या भेटू संध्याकाळी.”
“आणि हो उद्या लवकर ये, फुलं घेऊन ये.”
“रोज तर आणतो. उद्या सुद्धा आणीन. बाय..!” असं म्हणत यश आणि स्मिता आपापल्या वाटेने घरी जाण्यास निघाले.