चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 9

“तुलाही कळलं असेल कि ते पोलिस स्टेशन नवीनच बांधलं आहे, कारण जुन्या पोलिस स्टेशनला आग लागली होती. त्यातच बरेचसे कागद जळून गेले. योगायोगाने तो हरवल्याची फाईल तेवढी जळण्यापासून वाचली शिवाय त्या वेळेस जे पोलिस होते त्यापैकी एकही आता तिथे नाही. नवीन आहेत त्यांना फक्त तो हरवला आहे यांचीच माहिती असेल. आता राहिला त्या तक्रारी आणि तुझा प्रश्न. सरिता ४ दिवस बेशुद्ध होती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती ठीक होती. पुन्हा कामालाही जाऊ लागलेली. पुढच्याच दिवशी आम्हाला फोन आला तिच्या हॉस्पिटल मधून. तसे आम्ही लगबगीने पोहोचलो तिकडे. सरिता एकदम hyper झाली होती. वेड्यासारखं वागत होती.”
“नक्की काय झालं तिला?” स्मिताच्या आईने विचारलं.
“तिचं म्हणणं होतं कि तिने यशला पाहिलं होतं त्याच वाटेवर, त्याचा तिचा मानसिक धक्का बसला होता मोठा.” स्मिताला आता काय चाललंय ते हळूहळू कळत होतं आणि त्या तक्रारी सुद्धा त्याच सांगतात. सगळ्यांनी त्याला बघितलं होतं. कसं ते कळत नाही. “आम्ही गेलो तिथे. आम्हाला तो दिसला नाही कधी. भूत, आत्मा यावर आमचाही विश्वास नाही. पण या सगळ्यांचे अनुभव आणि तुझा अनुभव हेच सांगतो ना.” सगळेच भेदरलेल्या अवस्थेत त्या घराबाहेर पडले. सगळंच विचित्र होतं, जे होतं ते खरं होतं कि भास तेच समजण्यापलीकडे होतं. स्मिताला आता तिकडे काम करणं शक्यच नव्हतं. तिने राजीनामा दिला आणि आपलं सामान आणण्यासाठी पुन्हा ती त्या हॉस्पिटल मध्ये आली. सामान घेऊन ती निघणार होती इतक्यात तिला आठवलं कि सरिताची treatment इकडेच चालू आहे. एकदा जाऊन भेटूया तिला. तशी ती गेली हॉस्पिटल मध्ये.

तिला भेटण्याअगोदर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी बोलावसं वाटलं तिला. त्यासुद्धा महिला डॉक्टरच होत्या. स्मिताच्या मनात काही प्रश्न होते.
“डॉक्टर, हे सगळं खरं आहे का सरिताच्या बाबतीत घडले ते?”
“हो, खरं आहे.”
“म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता?”
“तसं नाही म्हणता येणार पण यांचे अनुभव ऐकून विश्वास ठेवावा वाटतो.”
“तसे अनुभव मलाही आले आहेत.”
“खरंच?”
“पण मला नक्की काय घडलं ते कळत नाही.”
“तू एकटीच नाही आहेस. तुझ्यासारख्या अजून ९ आहेत.”
“म्हणजे त्या सगळ्या जणी ज्यांनी पोलिसात तक्रार केली होती.”
“हो, सगळ्याजणी इकडेच होत्या, treatment साठी. त्यातल्या सात जणी ठीक होऊन निघून गेल्या. दोन आहेत अजूनही.”
“पण इकडेच कश्या सगळ्याजणी.”
“सगळी गोष्ट सांगते तुला मी समजावून. सगळ्या गोष्टींची फाईल बनवली आहे मी. मीही थोडा research केला सगळ्यांवर.” त्यांनी फाईल स्मिता पुढे केली.
“यात जर बघितलस ना तर सगळ्यांचे अनुभव सारखेच आहेत. तुलाही तेच आले असतील अनुभव. सगळ्यांचं एकच वर्णन यशचं. तो येण्याअगोदर थंड हवा यायची. मग मोगऱ्याचा सुगंध, पौर्णिमेला तो नसायचा, अमावस्येला चेहरा अधिक उजळलेला असायचा. रोज संध्याकाळी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा. हेच अनुभव असतील ना तुला.” स्मिताने मानेनेच होकार दिला.
“अजून काही गोष्टी common आहेत. त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव होतं सरिता. तुझं नाव आहे स्मिता. शिवाय बाकीच्या इतर जणींचं नावही ‘स’ वरूनच सुरु होते. स्नेहा, सुषमा. शेवटची तक्रार सुद्धा ‘संगीता’ चीच होती ना. बरोबर ना.”“शिवाय सरिता ‘आधार’ हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती, ती त्या सरकारी क्वॉर्टर्स मध्ये रहायची. त्यांच्या जाण्यायेण्याचा रस्ता एकच होता. इतर ८ जणीही त्याच हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होत्या, त्याच रूम मध्ये राहायच्या आणि तो रस्ता use करायच्या. तुझं पण असंच असेल ना.”
“हो. पण याचा अर्थ काय?”