चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 8

“आजपासून १० वर्षापूर्वीची गोष्ट. आम्ही कुंभार गावात राहत होतो. यशही तिकडेच जॉबला होता ना म्हणून शहरात राहण्यापेक्षा गावातच राहणं पसंत होतं यशला. तिकडच्याच हॉस्पिटल मध्ये सरिताची ओळख झाली. ती डॉक्टर आणि हा इंजीनियर. चांगली जोडी होती. लग्नही ठरलं होतं दोघांचं. दोघेही एकाच वेळेस घरी यायचे. एकच वाट ना दोघांची. त्या दिवशी सुद्धा रोजच्या सारखे निघाले घरी येण्यासाठी लग्नाच्या गप्पागोष्टी करत. नेहमीचीच वाट त्यांची त्यामुळे जरा बिनधास्त होते दोघेही. अचानक कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला. कोण होते माहित नाही ते, डाकू, गुंड. सरिताला कसबसं सोडवलं यशने आणि पुढे जाऊन मदत घेऊन ये असं सांगितलं त्याने. मात्र तो अडकला त्यांच्यात. सरिता धावत धावत आली आमच्याकडे. तसे आम्ही लगेचच पोहोचलो तिकडे तर कोणीच नव्हतं तिकडे. खूप शोधलं आम्ही यशला त्या रात्री. मिट्ट काळोख तिकडे. काहीच दिसत नव्हतं.”
“मग पुढे काय झालं ? " स्मिताने धीर करून विचारलं.
“पोलिसात तक्रार केली तर ते म्हणाले तो आमचा एरिया नाही. त्यांनीही हात वरती केले. गावात ना शहरात. कोणीच तक्रार नोंदवायला तयार नव्हतं. यश काही घरी आला नाही. ४ दिवसांनी मात्र एक हवालदार आला आमच्याकडे आणि सगळ्यांना घेऊन गेला. सरिताही होती आमच्या सोबत. जिथून यश बेपत्ता झाला होता तिथूनच खूप आतमध्ये जंगलात एक प्रेत सापडलं होतं. त्याच्या कपड्यावरून आणि सामानावरून तो यशच होता याची खात्री पटली आम्हाला.” असं बोलले आणि सगळे गप्प झाले.
“संपूर्ण शरीर जंगली प्राण्यांनी ओरबाडलं होतं. चेहरा ओळखता येत नव्हता. पोलिसांना तिथे त्याचं ओळखपत्र मिळालं. तो यशच होता. आमचा यश. सरिताही होती तिकडे. ते बघून ती बेशुद्ध झाली. मग तिला तिच्याच हॉस्पिटल मध्ये admit केलं. यशचं प्रेत गावात घेऊन जाऊ शकत नव्हतो, दुर्गंध पसरला होता. पोलिसांनी सांगितलं कि काहीच पुरावे नाही आहेत कि याचा खून झाला आहे. जंगली प्राण्याचं ही काम असेल हे. त्याला तसंच टाकून जाता येत नव्हतं तरी त्याचे उरले सुरलेले शरीराचे अवयव आम्ही जंगलाबाहेर आणले आणि त्या वाटेवर एक मोठ्ठं मोगऱ्याचं झाड आहे त्याच्या शेजारीच यशला जमिनीत पुरलं.” आणि यशचे पप्पा रडायला लागले. स्मिता काही बोलतच नव्हती. तिच्या पप्पानी यशच्या पप्पांना आधार दिला. तेव्हा ते शांत झाले.
“या फाईलमध्ये त्याची death certificate आहे.” असं म्हणत त्यांनी ती फाईल स्मिता पुढे केली. त्या फाईल मध्ये होतं सगळं, तो हरवल्याची तक्रार केलेले पेपर्स, त्याचे फोटो आणि death certificate. आता तर काहीच राहिलं नव्हतं बोलण्यासारखं. तरी ती बोलली,
“पण मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. तो जर १० वर्षापूर्वी गेला आहे तर तो मला कसा भेटायचा, पुन्हा त्याच्या नावावर इतक्या तक्रारी आहेत पोलिस स्टेशन मध्ये आणि त्यांनी मला कसं सांगितलं नाही कि तो आता जगात नाही आहे. death certificate पण त्यांनीच बनवली असेल ना.”