चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 7

स्मिता स्वतःच्या घरी आली, मुंबईतल्या. आई-वडिलांना तिने काय काय घडलं ते सगळं सविस्तर सांगितलं.
“मला वाटते ना, हा यश नक्की मुलींना फसवत असेल आणि त्यांच्याकडून पैसे वगैरे घेऊन पळून जात असेल.” स्मिताची आई बोलली.
“अगं आई, मग माझ्याकडून त्याने कधीच पैसे मागितले कसे नाहीत?”
“पण एक गोष्ट आहे. तो त्या गावातून नक्कीच शहरात आला असेल आता. पोलिसही मागावर आहेत ना त्याच्या.”
“हो पप्पा. ९ तक्रारी आहेत त्याच्या नावावर.”
“बरं. त्याचा पत्ता आहे ना. चल, आम्हीही येतो तुझ्या बरोबर. आम्हालाही कळू दे नक्की काय भानगड आहे त्या यशची.” आणि स्मिता बरोबर तिचे आई-वडील निघाले त्यांच्या घरी. पत्ता होता त्यामुळे घर शोधायला जास्त मेहनत करायला लागली नाही. दारावरची बेल वाजवली.
“कोण पाहिजे आहे आपल्याला?”
“धर्माधिकारींचं घर आहे ना हे?”
“हो. आपण कोण?”
“आम्ही... आम्ही या मुलीचे पालक आहोत. हिला यश सोबत लग्न करायचे आहे.”
“काय बोलताय तुम्ही?” दारातल्या बाई किंचाळल्या. आवाज ऐकून घरातून एक माणूस बाहेर आला.
“काय झालं आणि कोण तुम्ही?”
“यांना यश बरोबर बोलायचे आहे.”
“बरं. ठीक आहे. पहिलं तुम्ही घरात या. मग बोलू सविस्तर.” त्यांच्या अश्या बोलण्याने स्मिताच्या जीवात जीव आला. म्हणजे यश नक्कीच इकडे असणार. कदाचित आपल्या लग्नाचं बोलायला आला असेल गावातून. स्मिता मनातल्या मनात बोलली.
“मी यशचा पप्पा आहे आणि हि त्याची आई आहे. बोला, काय बोलायचे आहे तुम्हाला.”
“माझी मुलगी आणि तुमचा यश दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.”
“यश बोलला का तुम्हाला तसं?” यशच्या पप्पांनी त्यांना विचारलं.
“तो बोलला नाही. पण त्याला आवडायची मी. म्हणून मीच त्याला लग्नाचं विचारलं होतं.”
“तुला भेटायचा यश?”
“हो. अगदी रोज भेटायचो आम्ही. तेव्हाच ओळख आमची.”
“कसं शक्य आहे ते?” यशची आई बोलली.
“का शक्य नाही? तो रोज हिला भेटायचा. रोज एकत्र घरी यायचे. प्रेम होत स्मिताचं यश वर आणि तो इकडे आला पळून लग्नाचं विचारल्यावर. त्याला बोलवा आधी बाहेर.”
“यश कोणाचीच फसवणूक करू शकत नाही.”
“का शक्य नाही?” स्मिता चिडून बोलली.
“तो कोणालाच फसवू शकत नाही कारण.... आता तो या जगातच नाही आहे.” यशचे पप्पा बोलले, तसे सगळे गप्प झाले. यशची आई रडतच घरात आत पळत गेली. सगळं कसं विचित्र वाटत होतं.
“काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळत आहे का?” स्मिताच्या आईने यशच्या पप्पांना प्रश्न केला. स्मिता तर स्तब्ध झाली होती. यशचे पप्पा उठले आणि कपाटामधून त्यांनी एक फाईल काढली. त्यातून एक फोटो स्मिताला दाखवला. “हाच यश आहे ना.” तिने फोटो पाहिला आणि होकारार्थी मान हलवली.