चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 4

“नमस्कार सर, तुम्ही Eco कंपनीत जॉबला होतात ना?” दरवाजा उघडताच स्मिताने प्रश्न केला.
“हो. पण तुम्ही कोण?” आता त्यांना खरं तर सांगू शकत नाही.
“मी स्मिता, यशची मैत्रीण. तुम्ही ओळखता ना यशला.”
“तुम्ही प्रथम आतमध्ये या. मग बोलू आपण.” तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली.
“हं... बोला आता. काय काम होतं तुमचं? आणि यशची कशी ओळख?”
“मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे.” स्मिताला खोटंच बोलावं लागलं.
“खूप वर्षांनी आली मी भारतात. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला. मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.”
“यश Actually मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.”
“म्हणजे?”
“तो होता माझ्या हाताखाली कामाला. चांगला होता. पण १० वर्षापूर्वी.”
“१० वर्षापूर्वी?”
“हो. मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.”
“नक्की काय ते मला कळलं नाही सर.”
“तो अचानक जॉबला येईनासा झाला. नंतर काही तो आला नाही कधी.” सर बोलत होते.
“मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का?”
“केलेला. एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो. पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते.”
“तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा?”
“आहे ना. ‘कुंभार’ गावात सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. ‘धर्माधिकारी’ नाव आहे घराचं.”
“अरे, माझ्या रूमच्या मागेच आहे घर वाटते.” स्मिता मनातल्या मनात बोलली.
“तरी तुम्हाला काय वाटत सर, कुठे गेला असेल तो?”
“तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता. त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस. म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाणं त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते. परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.”
“बायको?” स्मिता उडालीच.
“तशी बायको म्हणता येणार नाही. पण लग्न करणार होते ते लवकरच. मग तिच्या बरोबर तो गेला असेल.”
“काय... काय नाव होतं तिचं?”
“नाव... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती. इकडे पुढे ‘आधार’ नावाचं हॉस्पिटल आहे ना तिकडे डॉक्टर होती ती. नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.”
“बरं, Thanks Sir” असं म्हणत यशचा गावातला पत्ता घेऊन ती निघून आली. सगळंच काही विचित्र होतं. पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून.... कदाचित.