चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 3

“तुमच्याच हॉस्पिटल मधल्या आतापर्यंत ९ जणींनी येथे ‘यश’ संबंधी तक्रार नोंदवली आहे.” तश्या त्या दोघीही आश्चर्यचकित झाल्या.
“बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत. ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने.”
“कोणी? संगीता नाव होतं का तिचं?”
“हो. संगीताच नाव होतं तिचं.”
“आणि पुन्हा विचार करा या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारायला आले नाही. तुम्ही उगाच तक्रार करू नका.”
“पण, त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत?”
“सगळ्याच्या तक्रारी तो हरवल्याच्या आहेत.”
“हे कसं शक्य आहे?”
“ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका.” स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली,
“‘मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा?”
“या ९ तक्रारी गेल्या १० वर्षातल्या आहेत. प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त. जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली. इकडे आता सगळेच नवीन आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचं तसं काही माहित नाही. पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या. त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला. आता एवढा माणूस जाणार कुठे? तरी मला वाटते तो चोर असावा. शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल. पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित. आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची.नाहीतर गेलो असतो तिकडे पण. तुम्ही तसच करा. तक्रार करू नका. तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा. मी कळवतो काही कळल तर.” त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.

“हे कसं शक्य आहे? जो माणूस मला रोज भेटायचा तो १० वर्षापूर्वी कसा काय हरवू शकतो?” स्मिता तिच्या मैत्रिणीला बोलली.
“काही तरी नक्कीच गडबड आहे. मला तर वाटते.”
“काय?”
“तो खरंच चोर असेल गं.”
“अगं, मग तो पोलिसांना कसा भेटत नाही.”
“माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता.”विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला. अचानक तिला आठवलं त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो.
“काय नाव होतं कंपनीचं.. हा...Eco. तेच नाव होतं. त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होतं मी.” आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि “Eco” नावाची एक कंपनी होती, शहरापासून थोडी अलीकडे. शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं, त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही. अगदी बॉसलाही. तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं. स्मिताला रडूच आलं. आता कुठे शोधू मी त्याला. रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.
तेवढयात मागून “थांबा madam” असा आवाज आला.
वॉचमननी हाक मारली होती. “काय झालं madam? कशाला रडता. बसा इकडे. उनाचं बाहेर नका जाऊ. पाणी प्या.” स्मिता शांत बसली आणि पाणी पिऊन बरं वाटलं.
“काका, मी इकडे आले होते एकाला शोधायला. पण इकडे कोणालाच माहित नाही.”
“कोणाला?”
“यश नाव आहे त्याचं.”
“यश साहेब..” वॉचमन बोलला. तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली.
“तुम्ही ओळखता त्याला? कुठे आहे आता तो?”
“माहित नाही madam. यश साहेब होते इकडे कामाला पण १० वर्षापूर्वी. नंतर कुठे गेले माहित नाही आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत.” या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला.
“हा पण आमचे जुने साहेब त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांना माहित असेल.” ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात. खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्यांचं घर.