चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 10

“मी सुद्धा यशच्या घरी जाऊन आले. तेव्हा मला हे सगळं कळलं. सगळ्यांनाच मानसिक धक्का बसला होता. सरिता अजून त्याच अवस्थेमध्ये आहे. तुझ्या अगोदरची डॉक्टर संगीता, तिही माझ्याकडे treatment घेत आहे. त्या सगळ्या इकडेच का treatment घेत होत्या ते तुला कळलं असेल ना. कारण ज्याच्यामुळे सगळं घडलं त्याचं ‘मूळ’ इकडेच आहे ना.” स्मिता नुसतंच ऐकत होती.
“त्याला मोगऱ्याच्या झाडाखाली पुरलं होतं म्हणून तो येताना मोगऱ्याचा सुगंध यायचा. मोगऱ्याची फुलं आणायचा. अशी संगीता म्हणते कधी कधी. त्यावर मी काही बोलत नाही. पण त्याने कोणाला फसवलं नाही गं. त्या मुलींना आणि तुला पण जेव्हा तुम्ही अडचणीत आलात तेव्हाच तो आला तुमच्या मदतीला.”
“पण आम्हालाच का? तिकडेच राहणाऱ्या, त्याच हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्यांनाच का?”
“मला वाटते, तो त्याच्या बायकोच्या शोधात असेल. तुझ्यामध्ये आणि त्या इतर मुलींमध्ये सुद्धा. त्यामुळे जेव्हा जेव्हा तू आणि त्यांनी त्याला लग्नाचं विचारलं, तेव्हाच तो गायब झाला. बरोबर ना.” स्मिता सरिताला भेटायला आली होती. तिला न भेटताच अनेक गोष्टी स्मिताला कळल्या होत्या. ती काहीही न बोलता तशीच निघाली.
“एक गोष्ट सांगू का स्मिता तुला.” डॉक्टरनी तिला थांबवत म्हटलं तशी स्मिता थांबली.
“या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत. प्रथम माझाही विश्वास नव्हता या गोष्टींवर पण या सगळ्यांमुळे मला विश्वास ठेवावा लागतो. शेवटचं सांगते तुला. जर आपण देव आहे असं म्हणतो तर भूतांवर सुद्धा विश्वास ठेवावा लागेल आपल्याला.” स्मिता तशीच निघून गेली काहीही न बोलता.

स्मिताने राजीनामा दिला होताच. त्याचबरोबर तिने शहरही सोडलं आणि परदेशात गेली ती कुटुंबाबरोबर कायमची. तिची जागा भरून काढण्यासाठी अजून एक महिला डॉक्टर आली तिचं नाव होतं “सायली”. पहिलाच दिवस हॉस्पिटलमधला.
“काय गं, ती जुनी डॉक्टर एवढ्या लवकर गेली सोडून.”
“माहित नाही. पण ती परदेशात गेली. कदाचित तिकडून ऑफर आली असेल तिला.”
“किती छान. मलाही भेटली पाहिजे अशी ऑफर.” तश्या दोघी हसू लागल्या. त्याच सरकारी क्वॉर्टर्समध्ये राहायला आलेली होती. नवीन होती ती गावात. त्यामुळे बसची वेळ विसरली. धावतच बाहेर आली तेव्हा बस निघून जाताना तिने पाहिली. आता चालण्याशिवाय पर्याय नाही. “त्याच” वाटेवर आली ती आणि रस्ता विसरली. वाट चुकली. त्यात अमावस्येची रात्र. आकाशात लाखो चांदण्या - तारे चमचम करत होत्या. मिट्ट काळोख. कुत्रे भुंकत होते. रातकिडे आवाज करत होते. भयावह वातावरण अगदी. एकटीच होती ती. घाबरली. तिथेच एका दिव्याखाली बसून ती रडू लागली. ५-१० मिनिटं झाली असतील. थंड हवेची झुळूक आली, त्याचबरोबर मोगऱ्याचा सुगंध. किती छान वाटलं तिला आणि अचानक तिच्यामागून आवाज आला.
“Excuse me, madam. काही मदत करू का मी तुम्हाला?”