चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha

मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला. तशीच रडत होती ती. अचानक कुठे गेला यश...
चांदण्यात फिरताना या कथेचा भाग २

स्मिता हल्ली उदास उदास राहायची. तिच्या मैत्रिणींना सुद्धा कळलं होतं.
“काय झालं स्मिता? गप्प गप्प असतेस?” तशी स्मिता रडायला लागली.
“अगं, मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना. कुठे गेला कळतंच नाही मला.” रडतच ती सांगत होती.
“मग त्याला फोन करायचा ना.”
“नाही वापरत तो mobile.”
“पहिलं तुझं रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते.” स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली.
“तुला सांगितलं होतं ना तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं. दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला तेव्हापासून आज आठवडा झाला तरी तो मला भेटलाच नाही.”
“अगं उशिरा निघत असेल तो.”
“नाही गं. रोज एक तास तरी थांबते मी. नाहीच येत तो.”
“आणि mobile चं काय बोललीस?”
“तो म्हणायचा गावात रेंज नाही येत मग mobile कशाला वापरायचा. घरीही फोन नाही. गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो. कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ
भेटायलाच जातो, असं म्हणाला तो.” दोघीही गप्प झाल्या.
“आता काय करायचं गं. पप्पा बोलले मी येऊ का गावात त्याची चौकशी करायला.”
“नको, पप्पांना नको बोलावू. मला वाटते तो ना चोर असणार. गावात असे खूप असतात गं फसवणारे. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर. तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया हरवल्याची.”
“ठीक आहे. चल.” असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या.