बाय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ फेब्रुवारी २०१७

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha - Page 2

खाऊन झाल्यावर त्यांनी सिनेमाला जायचं ठरवलं कारण तिकीट्स होती. ते आत गेले खरे पण ह्या वेळेस थिएटर जरा वेगळंच दिसत होतं. जरा जास्तच भरलं होत म्हणा ना. कारण ह्या वेळेस त्याने सकाळचा मोकळा थिएटर असलेला शो बुक केला नव्हता. पण सलमानचा पिक्चर असल्यामुळे आज भलतीच गर्दी जमली होती आणि त्या किती तरी वर्षांनी ती दोघं सगळ्यांसारखी प्रत्येक वाक्यावर ओरडत होती, शिट्ट्या मारत होती. ती तर एकदा उठून टाळ्या वाजवत होती हेही बहुदा तिच्या लक्षात आलं नसावं. तेव्हा जर तिथे उजेड असता आणि तिने मंदारचं तोंड बघितलं असतं तर ती वेडीच झाली असती. किती तरी वर्षांनी फिल्म बघताना त्या दोघांनी एवढी मज्जा केली होती. अगदी अकरावीत असताना मित्रांसोबत केली असेल तशी. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हात घातले नाहीत कि हळूच एकमेकांकडे बघितलं नाही. त्यांनी फक्त मज्जा केली. दोन जुने मित्र भेटल्यावर करतात ना तशी.

एवढं होईपर्यंत ती दोघं एतकी दमली होती कि ते सरळ तिच्या रुमवर गेले. Bags घेतल्या आणि स्टेशनवर जाऊन बसली. स्टेशनवरच्या गर्दीत ती दोघं कधी हरवून गेली त्याचं त्यांनाही कळलं नाही. तो विचार करत होता कि जर त्याचा मित्र गेला असता तर त्या दोघांनी किती मज्जा केली असती. आता परत कधी तिच्याशी बोलायला भेटेल, तिच्या हातात हात टाकायला मिळेल हे त्याचच त्याला माहित नव्हतं. त्याला खुप वाईट वाटत होतं. तिकडे मैथिलीचंही काही वेगळं नव्हतं. तिलाही सारखी रुखरुख लागली होती कि आता त्या दोघांना कधी एकत्र वेळ मिळेल, त्यांचं काय होईल हेच त्यांना माहित नव्हतं. अचानक त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू नाहिसं झालं आणि त्यांच्या मनात एक वेगळीच भीती तयार झाली, भिती हरवून जाण्याची. येणारी जाणारी गर्दी त्यांना त्रासदायक वाटू लागली. ती दोघं एकाच बाकावर बसली होती तरी कुठल्यातरी अनोळखी माणसासोबत बसलीत असं वाटत होतं त्यांना. तिला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावसं वाटत होतं. त्याला तिला त्याच्या मिठीत घ्यायचं होतं पण त्यांच्या आड येत होती ती गर्दी. असाच वेळ गेला, जात राहिला आणि तिची ट्रेन हळूहळू platform कडे येऊ लागली. ती ट्रेन हळूच आली आणि तिच्या जागेवर येऊन थांबली. ती उठली. त्याने तिच्या Bags घेतल्या. ती दोघं ट्रेन जवळ आली. त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं. आता परत कधी? हा एकच प्रश्न त्या दोघांच्या डोळ्यात होता. आता ट्रेन जाणार, तिने त्याच्याकडे बघितलं आणि तिला जाणवलं की आता ते दोघं कधीच कॉलेजमधले प्रियकर प्रेयसी राहणार नाहीत. ती दोघं कधीच लपून भेटणार नाहीत. ती खाली आली आणि त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. ती फक्त त्याच्याकडे बघत होती. तोही तिचा चेहरा अगदी एखाद्या तहानलेल्या पक्ष्यासारखा त्याच्या डोळ्यात साठवून ठेवत होता. त्या दोघांचे ओठ आपसूकच, अगदी नकळत, सहजपणे एकमेकांजवळ आले. तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. तिला अचानक सगळं शांत झाल्यासारखं वाटलं. गर्दी नाहिशी झाली. ट्रेनचा आवाजही तिला ऐकू येईनासा झाला. आता तिला कसलीच काळजी उरली नव्हती. तिने डोळे मिटले. तेवढ्यात ट्रेन चा आवाज तिच्या कानांवर पडला आणि सगळं जग आजूबाजूला परत निर्माण झालं. ती ट्रेन मध्ये चढली आणि ट्रेम सुरु झाली. ती दरवाज्यातच उभी होती. ती दोघं एकमेकांच्या दूर जाणार्‍या देहांकडे बघत होती. पण तिला मनात वाटत होतं, नाही विश्वास होता कि सगळं नीट होईल.