बाय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ फेब्रुवारी २०१७

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

सकाळचे नऊ वाजले असतील. ते त्यांच्या नेहमीच्या बागेत गेले. सहसा तेथे कोणीच नसतं पण आज पूर्ण बाग मुलांनी आणि आजोबांनी भरली होती. त्या दोघांनी फक्त एकमेकांकडे बघितलं. नुकतीच सुट्टी सुरु झाली होती आणि ह्या आधी कधीच ते सुट्टीत ह्या बागेत आले नव्हते. कधी क्लास बंक करुन तर कधी कॉलेजनंतर अश्याच वेळी यायचे ते. पण तेव्हा मात्र या बागेत कोणी नसायचं. फक्त ते दोघं. पण आता आलेच होते तर त्याने दोन चहा आणि एक बिस्कीट घेतलं आणि ते एका बाकावर जाऊन बसले. तिथून सारखं कोणीतरी जायचं. एखादे बाबा, तर कधी कोणाचा बॉल यायचा, तर कधीतरी ओली भेळ घेऊन यायचं. त्या दोघांना धड एकमेकांकडे बघता आलं नाही. त्या बागेत ती एकटीच अशी नटून बसली असावी. तिला एकदा त्याचच हसू आलं. चहा पिऊन झाल्यावर ते दोघं जवळच्या मंदिरात आले.

मंदिरात आल्यावर तिला जाणवलं कि दोघं पहिल्यांदा एकत्रच काय पण कॉलेजमध्ये आल्यापासून तीसुद्धा पहिल्यांदाच मंदिरात आली होती आणि तेही आज. एवढी लोकं होती तिथे तरीसुद्धा किती शांतता होती. ती देवासमोर उभी राहिली आणि तिने फक्त डोळे मिटले. पण आज तिला काहीच मागावसं वाटत नव्हतं. त्यानेही हात जोडले आणि ती नेहमी त्याच्या सोबत रहावी हेच मागितलं. मग दोघं थोडा वेळ तिथेच येणार्‍या जाणार्‍या लोकांकडे बघत बसली. त्या वातावरणाने त्या दोघांचीही जी एवढा वेळ घालमेल चालू होती ती थोडा वेळ का होईना आपोआप नाहीशी झाली. आता जरा ती दोघं शांत झाली आणि तेव्हा त्या दोघांना जाणवलं कि त्यांनी एकमेकांच्या आवडीचे कपडे घातले होते. ते बघून दोघांच्याही ओठांवर हसू उमटलं. त्याने का होईना त्यांना पुढचा दिवस काढायची स्फूर्ती मिळाली होती.

ते दोघेही उठले आणि त्यांच्या आवडत्या हॉटेलकडे कूच केली. पण as they expected रविवारमुळे तेथेही खूप गर्दी होती. मग काय, त्या दोघांचा हॉटेलसाठी शोध सुरु झाला. जवळपास एक तास गेला असेल पण त्यांना हवं तसं हॉटेल काही भेटलं नाही. त्या दोघांना भूक लागली होती. त्यामूळे त्यांनी एका गाडीवर थांबून वडापाव खाल्ले आणि तिथेच बसून एक एक कोल्ड कॉफी घेतली. हे करायची त्यांची पहिलीच वेळ होती. भुकेच्या सपाट्यात त्यांनी बरेच वडापाव खाल्ले आणि त्यांना भुक लागल्यावर कसे होतात ते देखील पहिल्यांदाच समजलं होतं आणि एकमेकांबद्दल नव्यानेच काहीतरी जाणवलं होतं. आता त्यांना काहीही खायची इच्छा राहिली नव्हती. उन्हाने त्या दोघांचेही चेहरे वेगळेच झाले होते. दोघेही जरा वेगळेच भासत होते.