बायंगी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जुलै २०१५

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha - Page 5

CL टाकून मी तातडीने रत्नागिरीला आलो. आलो तो तडक मंदारच्या घरी गेलो. मंदारच्या घरावर अवकळा पसरली होती. घरी पांढऱ्या कपड्यात खुपसे लोक जमले होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर दु:ख दिसत होते. घरात गेलो असता मला समोरील भिंतीवर चंदनपुष्पांची माळ घातलेला राणीचा फोटो दिसला आणि काळजात चरर् झाले. माझे डोळे मंदारला शोधत होते. आतल्या एका बेडरूम मध्ये शून्यात नजर लावून तो एकटाच बसलेला मला दिसला. मी त्याच्याकडे जाणार इतक्यात तुषारने मला अडवले. मी त्याला विचारले की नक्की काय झाले. तो म्हणाला, “बाजुला चल सांगतो. गेल्या पौर्णिमेला मंदारकडे त्या बायंगीने राणीचा बळी मागितला. मंदार ही मागणी ऐकताच एकदम भडकला आणि त्या भुतावर धाऊन गेला. त्याला शिव्या देत इथुन चालता हो वगैरे रागात वाट्टेल ते बोलला. काही न बोलता ते भुत तिथून गायब झाले. मंदारला वाटले की आता काही काळजी नाही बहुतेक ते भुत त्याचे घर सोडुन कायमचे निघुन गेले पण वस्तुस्थिती तशी नव्हती. बरोबर रात्री १२ वाजता राणीच्या पोटात असह्य कळा सुरु झाल्या. वेदनेने ती गडाबडा लोळु लागली. तिची आतडी पिळवटुन निघत होती. नंतर तिचा गळा कोणी तरी प्रचंड ताकदीने दाबत असल्याचे तिला जाणवले. तिला श्वास घेता येईना, एकदम घुसमटल्यासारखे झाले. छातीवर मणामणाचे ओझे ठेवल्यासारखे ती तडफडत होती. मंदार लाचारपणे ते सगळे पाहात होता. राणीची मदत तोच काय पण आता कुणीच करू शकणार नव्हते. डॉक्टर आले, त्यांनी तिला झोप लागावी म्हणुन इंजेक्शन दिले पण काहीच फरक पडला नाही. मंदारने त्या बाबाला फोन केला तेव्हा तो काहीही करण्यास असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. मी आधीच तुम्हाला सावध केले होते पण तुम्ही माझे ऐकले नाहीत. आपली ईच्छा पुर्ण केल्याशिवाय ते भुत स्वस्थ बसणार नाही. पौर्णिमेच्या आधी जर का तुम्ही त्याला मुक्त केले असते तर कदाचित काही करता आले असते पण आता वेळ निघुन गेली आहे. तुम्ही त्याला जायला सांगितले असल्यामुळे त्याची ईच्छा पुरी झाल्यावर ते तिथुन निघुन माझ्याकडे परत येईल. तुमच्या नुकसानाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नाही. असे म्हणुन फोन कट झाला. थोड्याच् वेळात राणीची प्राणज्योत मालवली”

मी मंदारच्या बेडरूम मध्ये जड पावलानी गेलो. मला पाहताच मंदार मला घट्ट बिलगला आणि ढसा ढसा रडु लागला. रडता रडता म्हणाला तुझे मी ऐकायला हवे होते रे! जिच्यासाठी मी हे सगळे केले त्या माझ्या लाडक्या राणीचाच त्याने बळी मागितला. तुझे ऐकले असते आणि वेळीच ते परत दिले असते तर आज माझी राणी कदाचीत जिवंत असती. तिच्याबरोबर माझे बाळ पण गेले रे! मी आता जगुन काय करू? कोणासाठी जगु? म्हणुन त्याने हंबरडा फोडला. त्याची ती अवस्था बघुन माझा जीव तीळ तीळ तुटला पण जे घडु नये ते घडले होते. यशासाठी वापरलेल्या शॉर्टकटने मंदारचे सर्वस्व लुटुन नेले होते.